वाणेवाडी : पाचपैकी दोन आरोपीना अटक

तथाकथित महाराज काका उंबरेवर ढोकी पोलीस मेहरबान 
 

धाराशिव - तालुक्यातील वाणेवाडी  येथील श्री संत नारायण  रामजी बाबा अध्यात्मीक संस्था या संप्रदायीक शिक्षण देणाऱ्या आश्रमातील प्रेम लहु शिंदे या १४ वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या पाच पैकी दोन आरोपीना ढोकी पोलिसांनी अटक केली आहे. पण मुख्य आरोपी असलेल्या काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यांच्यावर पोलीस मेगरबन झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस या प्रकरणाची माहिती देत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.  


धाराशिव तालूक्यातील वाणेवाडी  येथील एका अध्यामिक आश्रमशाळेत दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे शनिवारी रात्री उघडकीस आले होते.  आशमशाळेचे संस्थापक आणि अध्यात्माचे धडे देणाऱ्या महाराजांनी बेदम मारहाण करून नंतर त्यास गळफास दिल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी  केला होता. याप्रकरणी ढोकी पोलिसानी  रविवारी पाच  जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  

पाचपैकी प्रशांत मारुती नांदे ( वय २९ रा. चिंचोली ता. लातूर ), मनोहर किसनराव इक्के (  वय २३, रा. पेरगव्हाण ता. परभणी ) सध्या रा. दोघे वाणेवाडी यांना पोलिसांनी अटक केली आहे, पण  मुख्य आरोपी असलेल्या काका उंबरे ,  माऊली महाराज उंबरे  आणि गोपाळ महाराज या तिघांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. 

मुलाचा मृत्यू झाल्यानंतर काका उंबरे  हा ढोकी पोलीस स्टेशनमध्ये प्रकरण दाबण्यासाठी तळ ठोकून बसून होता, पण गुन्हा दाखल होताच, तो फरार झाला आहे. पोलिसांनी त्यास वेळीच ताब्यत का घेतले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. याप्रकरणी सपोनि जगदीश राऊत यांना माहिती विचारली असता, त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गाडे यांच्याकडुन माहिती घ्या म्हणून सांगितले पण गाडे यांना पाच वेळा कॉल करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

ढोकी पोलीस याप्रकरणी दबावाखाली काम करत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास ढोकी पोलिसांकडून काढून, तो सीआयडीकडे देण्याची मागणी होत आहे. तसेच वाणेवाडीच्या या आश्रमशाळेची मान्यता काढावी, आरोपीवर भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. 

काय आहे तक्रार ? 

याप्रकरणी मयत मुलाच्या वडिलाने ढोकी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, 'माझा मुलगा प्रेम हा एक महीन्यापूर्वी कोणाला काही न सांगता घरी वाखरवाडी येथे सकाळी ६ वा. सुमारास आला होता. त्यावेळी त्यास घरी कोणालाही काही न सांगता का आलास असे विचारले असता त्याने मला नांदे महाराजांनी शेतात काम न केल्यामुळे खूप मारले आहे असे सांगितले. काका महाराज उंबरे हे आश्रमाच्या शेतात खूप काम करायला लावतात व इतर महाराज काम नाही केले तर मारहाण करतात व रागावतात. त्यांची मला भिती वाटत आहे असे सांगितले होते.''त्यांनतर मी त्यास परत त्याच दिवशी वानेवाडी येथील आश्रमामध्ये सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नेऊन सोडले होते. मी महाराजांना कशाबदल मारहाण केली आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले होते की, तो आश्रमामधून पळून जायचे म्हणत होता म्हणून मारहाण केली होती असे सांगितले होते. मी त्यांना परत मारहाण करू नका विश्वासात घेऊन शिकवा असे बोलून गावी आलो होतो.' 'त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी तुमचा मुलगा प्रेम हा रात्री १०.३० वाजल्यापासून आश्रमामधून बेपता आहे अशी माहिती मला मिळाली. त्यांनतर मी आश्रमामधील नांदे महाराज यांना फोन करून विचारले की, प्रेम कोठे आहे? त्यावर ते मला म्हणाले की, मी ढोकी येथे बघायला आलो आहे. तो आश्रमामधून कोठेतरी निघून गेला आहे असे सांगितले होते.

'त्यांनतर आमच्या गावातील पोलीस पाटील अजीत शिंदे यांनी फोन करून सांगितले की, दादा तुमच्या मुलाने आश्रमाजवळील शेतातील झाडास गळफास घेतल्याचे समजले आहे असे सांगितले. त्यानंतर मी माझे मोटारसायकलवर बसून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आश्रमामध्ये गेलो होतो. मी त्यांना रडत कोठे आहे मुलगा माझा असे विचारले असता तेथे नांदे महाराज, काका महाराज उंबरे, माउली महाराज उंबरे, पोलीस पाटील वाणेवाडी अरे हजर होते. त्यांनी मला मुलगा प्रेम गळफासाने लटकत असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ नेऊन दाखविले.विद्यार्थी व लोकांना विचारपूस केली असता मला समजले की, दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आश्रमातील मुलगा मनोहर किशनराव इसके (रा. पेगरगव्हाण ता.जि. परभणी) याने माझे मुलाने पैसे चोरल्याचे कारणावरून त्यास काठीने खूप मारहाण केली आहे. तसेच त्याच्या गालात चापटा मारल्या आहेत असे सांगितले होते.


श्री संत नारायण बाबा रामजी बाबा अध्यात्मिक शिक्षण संस्था (वाणेवाडी ता. जि. धाराशिव) येथे अध्यात्मिक शिक्षण घेत असतांना त्यास आश्रमातील मुलगा मनोहर किशनराव इक्के (रा. पेगरगव्हाण ता. जि. परभणी) याने पैसे चोरल्याचे कारणावरून काठीने व चापटाने मारहाण केलेली आहे. तसेच काका महाराज उबरे (रा. वाणेवाडी ता. जि. धाराशिव), प्रशांत मारुती नांदे (रा. चिंचोली ता.जि. लातुर), गोपाळ महाराज माउली महाराज उंबरे (रा. वाणेवाडी) यांनी शेतात काम का करत नाही या कारणावरून कशानेतरी बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या त्रासास व जाचास कंटाळून माझा मुलगा प्रेम शिंदे याने त्याचे जीवन संपवले  आहे.