उस्मानाबादेत फसवणुकीच्या दोन घटना 

कुरियरने १२० रुपयाचे पार्सल सोडवण्यास गेलेल्या व्यक्तीला ९३ हजाराचा गंडा 
 
एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलेल्या दोघांना ८५ हजार आणि ३५ हजाराचा चुना 

उस्मानाबाद  : पार्सल मिळण्याकामी उस्मानाबाद येथील विजय पवार यांनी संबंधीत कुरीअरचा संपर्क क्रमांक मिळवून त्या क्रमांकावर संपर्क साधला. यावर समोरील व्यक्तीने पवार यांना भ्रमणध्वनी मध्ये एक ऑनलाईन ॲपलीकेशन घेण्यास सांगून त्यानंतर पार्सल पुरवठ्याचे 120₹ शुल्क युपीआय प्रणालीद्वारे भरण्यास सांगीतले व त्यानंतर तुम्हाला अवघ्या 3 तासांत पार्सल मिळेल असे सांगीतले. 

यावर पवार यांनी ते ऑनलाईन ॲपलीकेशन भ्रमणध्वनीमध्ये घेउन त्यातील संकेतांक समोरील व्यक्तीस सांगीतला. या संकेतांकाधारे त्या अज्ञाताने पवार यांच्या भ्रमणध्वनीवरील स्क्रीन बघने सुरु केले. इकडे पवार यांनी युपीआय प्रणालीमार्फत ते पैसे पाठवताच त्या अज्ञातास पवार यांची युपीआय विषयक सर्व माहिती उपलब्ध्‍ झाली. यानंतर पवार यांच्या युपीआय निगडीत बँक खात्यातून 7 व्यवहारांत एकुण 93,499 ₹ रक्कम कपात झाल्याचे 7 लघु संदेश पवार यांना भ्रमणध्वनीवर प्राप्त झाले. अशा मजकुराच्या विजय पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

एटीएमचे कार्ड बदलून फसवणूक 

            दुसऱ्या घटनेत तात्या यशवंत सोनटक्के, रा. उस्मानाबाद व दत्तु तुकाराम ढोबळे हे दोघे दि. 01.11.2021 रोजी 18.30 वा. सु. उस्मानाबाद येथील मोरे कॉम्प्लेक्स येथील एसबीआय एटीएममध्ये डेबिट कार्डद्वारे पैसे काढत होते. यावेळी त्या दोघांना पैसे काढण्यास अडचण येत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या एका 45 वर्षीय पुरुषाने मदतीच्या बहान्याने त्या दोघांचे डेबिटकार्ड आपल्या हाती घेतले. त्यानंतर त्याने त्या दोघांना त्याच रंगसंगतीचे दुसरे कार्ड दिले परंतु हा कार्ड बदलण्याचा प्रकार त्या दोघांच्याही लक्षात आला नाही. यानंतर 19.00 वा. सु. तात्या सोनटक्के यांना त्यांच्या बँक खात्यातून 85,000 ₹ रक्कम कपातीचा व दत्तु ढोबळे यांना त्यांच्या बँक खात्यातून 30,000 ₹ कपातीचा बँकेचा लघु संदेश प्राप्‍त झाला. अशा मजकुराच्या तात्या सोनटक्के यांनी दि. 02.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.