उस्मानाबादेत तोतया पोलीस इंस्पेक्टरचा सुळसुळाट 

 
एक वृद्ध शेतकरी रस्त्याने जात असताना, एक भामटा म्हणाला "मी पोलीस इंस्पेक्टर तुकाराम शिंदे , नवीन एसपी साहेब आले आहेत " आणि पुढे काय झाले वाचा...  

उस्मानाबाद - उस्मानाबादेत तोतया पोलीस इंस्पेक्टरचा सुळसुळाट झाला आहे. एक वृद्ध इसम लेडीज क्लबपासून रस्त्याने जात असताना, एक भामटा त्यांना अडवून म्हणाला "मी पोलीस इंस्पेक्टर तुकाराम शिंदे , नवीन एसपी साहेब आले आहेत, तुमची झडती घ्याची आहे आणि त्याने हातचलाखी करून मोबाईल, सोन्याच्या दोन अंगठ्या असा ४३ हजाराचा ऐवज लंपास केला. 

भारत संभाजी उंबरे ( वय ७१ ) हे वृद्ध शेतकरी तांबरीतील हॉटेल अंबालाच्या पाठीमागे राहतात. १९ सप्टेंबर रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना, लेडीज क्लबजवळ एक भामटा मोटारसायकल वरून आला आणि त्यांना म्हणाला, "मी पोलीस इंस्पेक्टर तुकाराम शिंदे , नवीन एसपी साहेब आले आहेत  आणि तुमची झडती घ्याची आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याने बोगस ओळखपत्र देखील दाखवले. 

त्यानंतर भारत संभाजी उंबरे यांनी मोटारसायकलच्या टाकीवर हातरुमाल ठेवून मोबाइल, सोन्याच्या दोन अंगठ्या ठेवल्या असता, हातचलाखी करून या भामट्याने ते स्वतःच्या खिशात घातले आणि रिकामा हातरुमाल उंबरे यांच्या खिशात घातला. काही वेळानंतर भारत उंबरे यांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असता, पोलिसांनी अर्वाच्च भाषा वापरली. नंतर मात्र तक्रार नोंदवून घेतली. 

फसवणूक झालेल्या भागातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता, एका ठिकाणी बंद होते तर एका ठिकाणी हा भामटा कैद झाला आहे. हा भामटा खानापूरचा असल्याची चर्चा सुरु आहे. पोलीस या भामट्याला अटक करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.