गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या पाच शहरात दहा टोळ्या
नळदुर्ग - आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून धाराशिव जिल्ह्यात येणारा गुटखा उमरगा, नळदुर्ग मार्गे येतो.तिकडून हा गुटखा नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) आणि राम डोंबे ( बार्शी ) पाठवतो आणि या गाडी पकडण्याचे काम झिरो पोलीस करीत होते. गुटखा तस्करीतून पोलीस आणि झिरो पोलीस मालामाल झाले आहेत.
गुटख्याची गाडी पकडल्यानंतर तोडपाणी करायची आणि जर मनासारखी तोडपाणी नाही झाली तर गुन्हा दाखल करायचा असे मागील दोन वर्षांपासून सुरु होते. नळदुर्गहून पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आलेल्या सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या आशिर्वादामुळेच उमरगा, नळदुर्ग, सोलापूर, लातूर आदी ठिकाणी जवळपास आठ ते दहा टोळ्या ( झिरो पोलीस ) कार्यरत झाल्या होत्या.
सपोनि सिद्धेश्वर गोरे नळदुर्गला येण्यापूर्वी उमरगा येथे कार्यरत होते. तिथेच त्यांना ही झिरो पोलिसांची आयडिया सुचली होती.उमरगा येथे असतानाच नळदुर्गच्या एका टोळीबरोबर त्यांचे हितसंबंध निर्माण झाले होते. उमरग्यात लाखोंची माया जमवून, गोरे यापूर्वीच्या मोठ्या साहेबाना खुश करून नळदुर्गला आले होते. नळदुर्ग पोलीस सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजली जाते. त्यामुळे अवैध गुटखा, अवैध बायो डिझेल, स्वस्त धान्य दुकानातील मालाचा काळाबाजार, गोमांस यातून मोठी आर्थिक उलढाल सुरु होती. जोडीला मटका, चक्री जुगार, हातभट्टीची दारू यातून मोठी कमाई सुरु होती.
गोरे यांचे अवैध धंदे, गुंडगिरी करणाऱ्या तरुणासोबत जिव्हाळयाचे संबंध होते. गोरे यांचे नळदुर्ग दंगलीतील मुलाबरोबर अनेक फोटो धाराशिव लाइव्हच्या हाती लागले आहेत. गुंडगिरी करणारे , शहरात दहशत निर्माण करणारे गोरेंचा वाढदिवस पोलीस स्टेशनमध्ये जल्लोषात साजरे करू लागले. पोलीस स्टेशनमध्येच रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करू लागले, त्यामुळे नळदुर्ग शहरात गुंडांचे राज्य निर्माण झाले होते.
नळदुर्ग शहरात किरकोळ कारणावरून हाणामाऱ्या सुरु झाल्या, त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरु झाले. हे तरुण इतके मुजोर झाले की , चक्क पोलिसांच्या अंगावर तलवार उगारु लागले. बदलून गेलेले पोलीस उपनिरीक्षक मोटे यांच्या अंगावर काही तरुणाची हल्ला केला होता, हे त्यातूनच घडले होते.
गुटखा तस्करी अशी झाली उघड
दि. १९ जुलै रोजी नळदुर्गच्या झिरो पोलिसांनी गुटख्याचा एक आयशर टेम्पो पकडला होता. जवळपास तीन टन गुटखा त्यात होता. तोडपाणी न झाल्याने तो टेम्पो सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात देण्यात आला. गोरे यांनी परस्पर तोडपाणी करून, चालकाच्या फिर्यादीवरून पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. आपण साहेबाच्या सांगण्यावरून गाडी अडवली, वाटा तर मिळाला नाहीच शिवाय खोटा गुन्हा दाखल झाल्याने झिरो पोलीस चिडले आणि गोरेचा काळा धंदा पुराव्यासह पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे सादर केला. त्यामुळे गोरेंची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी झाली. आता हे झिरो पोलीस गोरेंचे आजपर्यंतचे काळे धंदे पुराव्यासह दररोज सादर करीत आहेत.
नळदुर्ग हद्दीत गाड्या आल्यानंतरच त्या पकडल्या जात होत्या. जरी दुसऱ्या हद्दीत गाडी पकडली तरी नळदुर्ग हद्दीत गाडी पडकल्याचे दाखवण्यात येत होते. तोडपाणी नाही झाली की गुन्हा दाखल करून वृत्तपत्रात बातम्या दिल्या जात होत्या. युट्युब चॅनलवर बाईट मोठी कामगिरी केल्याचा आव आणला जात होता. युट्युब पत्रकारांना दरमहा पाकीट मिळाल्याने तेही खुश होते. गोरेंची बदली झाल्यानंतर जणू काही मोठी कामगिरी करून साहेब जात आहेत म्हणून त्यांच्यावर फुले उधळून निरोप देण्यात आला पण गोरेंचा फुगा अवघ्या काही दिवसात फुटला.
सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी आजवर किती गाड्या पकडल्या आणि किती गाड्याबरोबर तोडपाणी केली याचे पुरावे झिरो पोलीस सादर करीत असून, कोणत्या पोलिसांमार्फत गोरेना हप्ता जात होता, हे ठामपणे सांगत आहेत. गोरेंचा सारा खेळ त्यांच्याच अंगलट आला आहे.
गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या पाच शहरात दहा टोळ्या
गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या नळदुर्ग, उमरगा, तुळजापूर लातुर, सोलापूर आदी पाच ठिकाणी जवळपास दहा टोळ्या कार्यरत आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून विविध कंपन्यांचा गुटखा निघाला की , खासगी इसमामार्फत या टोळ्यांना बरोबर खबर लागत होती. त्या गाड्या उमरगा, नळदुर्ग , तुळजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, ही टोळी गुटखा भरून आलेल्या वाहनासमोर जीप, कार, मोटारसायकल आडवी लावून चालकास कधी पोलीस मित्र, कधी पोलीस ,कधी बजरंग दलाचे कार्यकर्ते असे सांगून गाडीची तपासणी करत होते आणि गुटखा आढळल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गाडी नेण्याची भीती दाखवून मोठी तोडपाणी करीत होते. त्यात ७० टक्के पोलीस आणि ३० टक्के टोळी असा हिशोब ठरला होता. गाडीत लाखो रुपयाचा माल असल्याने किमान ५ ते १० लाखाची तोडी होत होती. या तोडपाणीतून उमरगा , नळदुर्ग पोलिसांबरोबर टोळीतील तरुण मालामाल झाले होते. या टोळीतील तरुणाकडे महागडे मोबाईल, गाड्या गुटख्याच्या तोडपाणीमधून आले आहेत.
वसुली दहा कंपन्यांची, साहेबाना मिळणार दोन कंपन्यांची
आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून गोवा गुटखा, बादशा , आरके गुटखा, सागर, विमल, हिरा, हिना, बाबा, आरएमडी असा दहा कंपनीचा गुटखा सप्लाय केला जातो. मुख्य गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) आणि राम डोंबे ( बार्शी ) असून, त्यांचा लाखो रुपयाचा हप्ता पोलिसाना सुरु आहे. वसुली करणारे पोलीस दहा कंपन्यांकडून वसुली करीत होते, वरिष्ठ साहेबाना मात्र दोनच कंपनीचा हप्ता पोहच करीत होते. त्यामुळे साहेबापेक्षा वसुली करणारे कोट्याधीश झाले आहेत.
येरमाळा पोलिसांची तुळजापुरात तोडपाणी
१४ ऑगस्ट रोजी गुटख्याची एक गाडी तुळजापूर शहराजवळील हॉटेल मातोश्रीसमोर ( तुळजापूर - धाराशिव रोड ) अडवून, येरमाळा पोलीस स्टेशनच्या वसुली करणाऱ्या पोलिसाने ५० हजाराची वसुली केल्याचा पुरावा धाराशिव लाइव्हच्या हाती लागला आहे. बोरकर नावाचा हा पोलीस बीड जिल्ह्यातील पोलिसांना देखील गुटख्याचा हप्ता पोहच करीत असल्याचे समजते. तुळजापूरचा दलाल पिके मार्फत एके च्या खात्यावर हे ५० हजार रुपये ट्रान्सफर झाले असून, बोरकरने ए के कडून नंतर रोख ५० हजार घेतले आहेत. जिल्ह्यात वसुलीचे मोठे जाळे पसरले असून, यात अनेक छोटे तसेच मोठे मासे अडकले आहेत. जिल्ह्यात कोणत्या पोलिसाना किती हप्ता मिळतो, याची बेरीज केली तर कोट्यवधींच्या घरात हिशोब जात आहे.