खेर्डा येथील दहा आरोपीला एक वर्ष कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड 

कळंब प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावली शिक्षा
 

कळंब  : तालुक्यातील खेर्डा येथील गावठाण मधील शासकीय भूखंड क्रमांक 128, 136 वरील अनधिकृत अतिक्रमणाचा पंचनामा चालू असताना शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासमोर जमाव जमवून दोघांना बेदम मारहाण करून जखमी करणाऱ्या दहा आरोपीला एक वर्ष कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल कळंब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( कोर्ट नंबर दोन ) अमृता चारुदत्त जोशी यांनी दिला. 


या खटल्याची पार्श्वभूमी अशी की ,  खेर्डा तालुका कळंब येथील गावठाण विस्तारवाढ मधील शासकीय भूखंड क्रमांक 128 ,136 वरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर खेर्डा गावातील काही लोकांनी आमरण उपोषण केले होते. सदर उपोषणाची जिल्हा प्रशासनाने दखल घेत तहसीलदार कळंब यांना चौकशीचे आदेश दिले होते.  त्या अनुषंगाने दिनांक 29 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 9.30 दरम्यान कळंब तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी भूखंड क्रमांक 128,136 वरील अनधिकृत अतिक्रमणाचा पंचनामा करत असताना खेर्डा येथील सुखदेव लक्ष्मण लोकरे व त्यांचा मुलगा पोपट सुखदेव लोकरे यांना अचानक जमाव जमवून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. 

या प्रकरणी पत्रकार बिभीषण सुखदेव लोकरे यांचे फिर्यादीवरून कळंब पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम 147 ,148 ,149, 323, 324 ,504 बॉम्बे पोलीस अॕक्ट 135 नुसार गुन्हा नंबर १२३/२०११ दाखल झाला होत.  सदर गुन्ह्यातील आरोपी विनायक माणिक लोकरे, अभिमन्यू विनायक लोकरे, गणेश महादेव लोकरे ,उमेश महादेव लोकरे, महेश उर्फ सचिन महादेव लोकरे, पांडुरंग रामहरी लोकरे ,शिवराज रामहरी लोकरे ,ज्ञानेश्वर विनायक लोकरे ,रामहरी माणिक लोकरे, रंगनाथ रोहिदास लोकरे सर्व राहणार खेर्डा तालुका कळंब यांच्यावरील कळंब न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर दोन यांच्या कोर्टातील खटला नं आरसीसी 252/2011 मध्ये दहा आरोपीच्या विरुद्ध कळंब पोलिसांनी तपास करून सबळ पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल केले होते. 

या प्रकरणात न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले तसेच न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी विनायक माणिक लोकरे ,अॕड.अभिमन्यू विनायक लोकरे, गणेश महादेव लोकरे ,उमेश महादेव लोकरे, महेश उर्फ सचिन महादेव लोकरे, पांडुरंग रामहरी लोकरे ,शिवराज रामहरी लोकरे, ज्ञानेश्वर विनायक लोकरे, रामहरी माणिक लोकरे, रंगनाथ रोहिदास लोकरे सर्व राहणार खेर्डा यांनी एकत्रित जमाव जमवून मारहाण करून गंभीर जखमी केले हे न्यायालयात सिद्ध झाले त्यामुळे सदर दहा आरोपींना एक वर्ष कारावास तसेच प्रत्येकी तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास दंड रक्कमेपैकी पाच हजार रुपये जखमी साक्षीदार पोपट सुखदेव लोकरे राहणार खेर्डा यांना देण्याचे आदेश करून सर्व आरोपींनी शिक्षा एकत्रित भोगावयाचे आहे असे कळंब न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं दोन अमृता चारुदत्त जोशी यांच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली .  सदर प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॕड.बी.बी मुंडे यांनी काम पाहिले त्यांना अॕड.के. एस ओव्हाळ यांनी सहकार्य केले.