विहिरीच्या कामासाठी परजिल्ह्यातील ११ मजुरांना गुलामाची वागणूक 

रात्री पळून जावू नये म्हणून साखळदंड, ढोकी पोलिसांनी केली मजुरांची सुटका 
 

धाराशिव - ढोकी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या  मौजे वाखरवाडी येथे परजिल्ह्यातील ११ मजुरांना आणून त्यांच्याकडून  बळजबरीने विहिरीचे काम करून घेतले होते, तसेच हे मजूर पळून जावू नये म्हणून रात्री साखळदंडाने बांधले जात होते. गुलाम झालेल्या या ११ मजुरांची ढोकी पोलिसांनी सुटका करून , एका गुत्तेदारासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

आज दिनांक 17/06/2023 रोजी 09:00 वाजण्याचे सुमारास पोलीस स्टेशन ढोकी येथे माहिती प्राप्त झाली की, मौजे वाखरवाडी ता.जि.उस्मानाबाद येथे संदिप रामकिसन घुकसे वय 23 वर्षे रा.कवठा ता.सेनगाव जि.हिंगोली यास बळजबरीने पकडुन ठेवुन त्याचेकडुन दिवसभर विहीरीचे काम करुन घेतात. अशी माहिती मिळाल्यावरुन ती माहिती पोलीस अधिक्षक साहेब,उस्मानाबाद, अपर पोलीस अधिक्षक  उस्मानाबाद, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जगदीश राऊत,  पोउपनि श्री.बुध्देवार, सपोफौ/816 सातपुते, पोह/48 शेळके, पोना/1871 क्षिरसागर, पोना/1760 तरटे, पोकॉ/916 शिंदे, पोकॉ/188 शिंदे, पोकॉ/529 गोडगे असे पथक तयार करण्यात आले होते, 

सदर पथकाने मिळाले बातमी ठिकाणी जावुन शोध घेतला असता त्याठिकाणी 1) भगवान अशोक घुकसे वय 26 वर्षे रा.कवठा ता.सेनगाव जि.हिंगोली हा मिळुन आला, त्याचे सोबत इतर 5 इसम नामे 2) मारुती पिराजी जटाळकर वय 40 वर्षे रा.आतकुर ता.धर्माबाद जि.नांदेड, 3) राजु गनुलाल म्हात्रे वय 22 वर्षे रा.मध्यप्रदेश, 4) मंगेश जनार्दन कानटजे वय 26 वर्षे रा.कुलमखेड ता.जि.बुलढाणा, 5) बालाजी शामराव वाघमारे वय 32 वर्षे रा.लिंबा ता.देगलुर जि.नांदेड, 6) गणेश अशोक पवार वय 30 वर्षे रा.नाशिक असे मिळुन आले आहेत. वाखरवाडी येथे मिळुन आलेल्या इसमांकडे चौकशी केली असता संदिप रामकिसन घुकसे हा मौजे खामसवाडी येथील विहीरीवर असल्याचे माहिती देवुन त्यांनी सोबत घेवुन चला अशी विनंती केली, त्यावरुन वाखरवाडी येथील मिळुन आलेले सहा इसमांना सोबत घेतल्यावर त्यांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी माहिती दिली की, संतोष शिवाजी जाधव (गुतेदार) व इतर एक हे दिवसा बळजबरीने विहीरीवर आमचेकडुन काम करुन घेतात व संध्याकाळी आमचे हाता पायाला पळुन जावु नये म्हणुन साखळीने ट्रॅक्टरला बांधुन ठेवतात अशी माहिती दिली. 

त्यानंतर पोलिसांनी  मौजे खामसवाडी येथे जावुन शोध घेतला असता त्याठिकाणी 1) संदिप रामकिसन घुकसे वय 23 वर्षे रा.कवठा ता.सेनगाव जि.हिंगोली याचेसह चार इसम नामे 2) भारत ललीत राठोड वय 26 वर्षे रा.रुई ता.मानोरा जि.वाशिम, 3) शरद दत्ताराव शिंदे वय 30 वर्षे रा.आडतोलाजी ता.जि.जालना, 4) अमोल संतोष निंबाळकर वय 22 वर्षे रा.शिरुभादा ता.मंगरुल जि.वाशिम, 5) प्रणव राजेंद्र पवार वय 29 वर्षे रा.औरंगाबाद असे साखळीने बांधलेल्या, घाबरलेल्या अवस्थेत, एका खडडयात मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांना कृष्णा बाळु शिंदे (गुतेदार) रा.भुम व इतर एक यांनी बांधुन ठेवुन त्यांना मारहाण करुन त्यांचेकडुन विहीरीवर काम करुन घेत असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर सदर आकरा घाबलेल्या स्थित असलेल्या इसमांना पोलीस स्टेशन ढोकी येथे आणण्यात आले असुन त्यावरुन पोलीस स्टेशन ढोकी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे.

पोलीस स्टेशन ढोकी हददीतील व शिराढोण हददीतुन एकुण आकरा इसमांची सुटका करुन पोलीस स्टेशन ढोकी येथील पोलीस पथकाने व पोलीस मित्र विशाल कानगे यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली विशेष कामगिरी केली आहे.ढोकी हददीत कोणी संशयीत रित्या दिसल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशन ढोकी येथे कळवणेबाबत याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.