बेंबळीत मतीमंद, मुकबधीर मुलीवर लैंगिक अत्याचार

अंधाऱ्या रात्री निर्जन शेतात घटना घडल्याने पोलिसांपुढे आव्हान 
 

उस्मानाबाद  : तालुक्यातील बेंबळी शिवारातील शेतात वास्तव्यास असलेल्या मतीमंद, मुकबधीर मुलीला मारहाण करत अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि.१८) मध्यरात्रीनंतर घडली आहे. या मुलीची प्रकृती गंभीर आहे.याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. 

बेंबळी येथील गतीमंद मुलीला (२१) वास्तव्यासाठी शेतात शेड मारून ठेवण्यात आले होते. तिला अचानक वेडसरपणाचा झटकाही येत होता. वेडसरपणात ती मारहाण करत असल्यामुळे तिला शेतात ठेवून उपचार करण्यात येत हाेते. रविवारीही ती शेतातच वास्तव्यास होती. तेव्हा तिचे वडील स्वत: आजारी असल्यामुळे उपचारासाठी गावात आले. नंतर शेतात न जाता ते घरीच थांबले. हा प्रकार माहिती असलेल्या व्यक्तीने मुलगी थांबलेल्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलीने विरोध केल्यावर तिला बेदम मारहाण करून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.सं. कलम- 376, 452, 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  यातील पिडीत तरुणी ही मतीमंद, मुकबधीर तसेच गंभीर जखमी झाल्याने आंतर रुग्ण असून गुन्हा हा अंधाऱ्या रात्री तसेच निर्जन शेतात घडल्याने आरोपी निष्पन्न करण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. पोलीसांनी कौशल्य पुर्वक तपास करुन तांत्रिक माहिती, खबऱ्यांच्या सहकाऱ्याने माहिती घेतली असता हा गुन्हा गावातीलच एका 26 वर्षीय तरुणाने केला असल्याचे निष्पन्न झाले. यावर त्यास आज दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी अटक करण्यात येउन पुढील तपास पिंक पथकामार्फत (महिला विरोधी अत्याचार तपास पथक) केला जात आहे.