उमरग्यात प्राध्यापकाच्या घरामध्ये दरोडा

साडेतीन लाखांचा ऐवज लुटला
 

उमरगा - शहरातील साईधाम कॉलनीत विवेकानंद चौकात मुरुम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय कल्याणी गुरव यांच्या घरात चोरट्यांनी दरोडा टाकला. चाकूचा धाक दाखवून मारहाण करत रोख रकमेसह तीन लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना रविवारी (दि. १४) मध्यरात्रीनंतर घडली.

प्रा. गुरव कुटुंबीयांसह रात्री भोजन उरकून झोपले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास किचनच्या पाठीमागचे दार तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या अंगावरील चादर ओढून ‘गप्प पडून रहा’, असा दम दिला. गुरव यांनी तोंडावरील चादर काढून पाहिले असता तोंडाला रुमाल बांधून दोघेजण जवळ उभे होते. एकजण दबा धरून उभा होता. त्यांच्या हातात काठी व कमरेला चाकू होता. एकाने हातातील काठीने डोक्यावर जोराने मारहाण करुन प्रा. गुरव यांना जखमी केले. 

दुसऱ्या दोन व्यक्तींनी कपाट उचकटून कपाटातील रोख एक लाख रुपये, दहा ग्रॅम सोन्याची साखळी, उशाजवळ ठेवलेल्या पॉकिटातील रोख १६ हजार रुपये, पत्नीच्या खोलीतून १५ ग्रॅम सोन्याचे नेकलेस, २५ ग्रॅम सोन्याचे गंठण, दहा ग्रॅम सोन्याचे कर्णफुले तर वडिलांच्या खोलीतून २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या तसेच रोख एक लाख १६ हजार रुपये रोख असा एकूण तीन लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लुटला.

 प्रा. गुरव यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर उस्मानाबाद येथील श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. यामध्ये चोरट्यांचा सुगावा लागला नाही. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे करत आहेत.