परंडा तालुक्यात आष्टा फाटा ते वांगी फाटा दरम्यान Road Robbery

रस्ता लुटमारीच्या गुन्ह्यातील आरोपी 24 तासात अटकेत
 

परंडा  : परंडा येथील संतोष मोरे हे दि. 26.12.2021 रोजी रात्री 10.30 वा. सु. वारदवाडी रस्त्यावरुन मोटारसायकलने पत्नीसह जात असतांना आष्टा फाटा ते वांगी फाटा दरम्यान एका बुलेट मोटारसायकलसह पांढऱ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या टोयोटा ईटीऑस कारमधून आलेल्या चार अनोळखी पुरुषांनी त्यांची मोटारसायकल अडवली. त्या चौघांनी मोरे पती- पत्नीस चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील 8 ग्रॅम सुवर्ण दागिने, एक चांदीची अंगठी, दोन स्मार्टफोन व खिशातील 12,000 ₹ रक्कम लुटून पलायन केले होते. यावर संतोष मोरे यांनी पोलीस ठाणे गाठून दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा क्र. 429 / 2021 हा नोंदवला आहे.

            परंडा पोलीस ठाण्याचे पोनि- सुनिल गिड्डे, सपोनि- विक्रांत हिंगे यांच्या पथकाने संतोष मोरे यांच्याकडून आरोपींची देहबोली व वाहन माहिती जाणून घेतली असता यातील पांढरी कार ही उस्मानाबाद तालुक्यातील पारधी पिढी, वरुडा येथे वापरात असल्याचे पथकास समजले. पथकाने आज दि. 27 डिसेंबर रोजी वरुडा येथील पारधी पिढीत छापा टाकून सचिन महादेव पवार या 20 वर्षीय तरुणासह एका अल्पवयीन युवकास (विधी संघर्षग्रस्त बालक) ताब्यात घेउन नमूद गुन्हा करण्यास वापरलेली पांढऱ्या रंगाची टोयोटा ईटीऑस कारसह लुटीतील चांदीची अंगठी व 4,000 ₹ रक्कम जप्त केली आहे. या कारचा परिवहन नोंदणी क्रमांकाचा उलगडा झालेला नसून त्या कारच्या मालकी विषयी व लुटीतील अन्य दोन आरोपीं विषयी परंडा पोलीस तपास करत आहेत.

            दुसऱ्या घटनेत परंडा पोलीसांनी  तडवळा (कसबे), ता. उस्मानाबाद येथील सलमानखाँ पठाण यास आज दि. 27.12.2021 रोजी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुध्द परंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. 102 / 2011 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल असून गेली 10 वर्षे पोलीस त्याचा शोध घेत होते.