धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर अणदूरमध्ये छापेमारी 

चार हातभट्टी विक्रेत्यांना पकडले

 
मोठे मासे सोडून छोट्या मासे पकडल्यामुळे  कारवाईवर संशय

धाराशिव - धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अणदूर येथील चार आणि  नंदगाव येथे एका हातभट्टी गावठी दारू विक्री दुकानावर छापे मारून ४८ हजार रुपयाची गावठी दारू जप्त केली आहे. मात्र मोठे मासे सोडून छोट्या मासे पकडल्यामुळे या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. 


अणदूर येथे मागील अनेक दिवसापासून जवळपास १५ ते १६ ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू विकली जात आहे. अणदूरमध्ये एकप्रकारे हातभट्टी गावठी दारूचा महापूर सुरु आहे. असे असले तरी नळदुर्ग पोलीस डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प होते. स्थानिक बिट अंमलदार सर्व दारू विक्रेत्यांकडून हप्ता  गोळा करून साहेबाना पोहच करीत असल्यामुळे 'तेरी भी चूप , मेरी भी चूप' असे सुरु होते. 

या गावठी दारू प्रकरणी धाराशिव लाइव्हने बुधवारी बातमी प्रकाशित करताच, स्थानिक गुन्हे शाखेला जाग आली , पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी दोन पथके नेमून अणदूर येथे गुरुवारी छापेमारी केली. चार किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई  करण्यात आली पण मोठे मासे सोडून छोट्या मासे पकडल्यामुळे या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. 

या विक्रेत्यांवर झाली कारवाई 

अणदूर ,नंदगाव ग्रामस्थ- संतोष हनुमंत भोसले,लक्ष्मी माणिक जाधव, विशाल प्रकाश खराडे, पुष्पा फुलचंद बंदपट्टे, मलेशाप्पा बाबु लामजाणे हे दि.04.05.2023 रोजी 19.07 वा. सु. अणदूर व नांदगांव अंदाजे एकुण 48,610 ₹ किंमतीच्या गावठी दारु व साहीत्यासह शिंदी ताडी तसेच देशी विदेशी अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

बिट अमलदाराला  नोटीस देणार का ? 

अणदूरमध्ये राजरोस गावठी दारू विक्री सुरु असताना, स्थानिक बिट अंमलदार आणि सपोनि मूग गिळून गप्प होते. स्थानिक गुन्हे शाखेने दारू पकडली असली तरी ती नळदुर्ग पोलिसाना कधी दिसली नाही का ? याप्रकरणी आता बिट अमलदाराला  नोटीस देणार का ?  असा प्रश्न विचारला जात आहे. सर्व बिट अंमलदाराच्या बदल्या झाल्या असताना, अणदूरच्या बिट अंमलदाराची बदली का केली नाही ? याबाबत पोलीस अधीक्षक सपोनिला विचारणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 

 दुकानात पेट्रोल विकणाऱ्यावर गुन्हा 

अणदुर ता.तुळजापुर येथील ग्रामस्थ- जयकुमार चंद्रशेखर आलुरे, व रविंद्र तम्माण्णा व्हंडरे या दोघांनी दि.04.05.2023 रोजी 15.30 ते 16.15  वा. सु. ज्वलनशील द्रव्यपदार्थ पेट्रोल हे जवळ बाळगल्याने मानवी जिवन धोक्यात येईल किंवा केाणत्याही व्यक्तीला नुकसान पोहचवण्याचा संभाव आहे हे माहीती असताना ही प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरुन जवळ बाळगलेला मिळुन आला. वगैरे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.वि कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द  स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.