चोरावर मोर : गुटख्याने भरलेल्या ट्रकवर दरोडा 

नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल 
 

नळदुर्ग  :  गुटख्याने भरलेल्या ट्रकवर नळदुर्गजवळ दरोडा टाकून चालकासह दोघांना बेदम मारहाण करून, गुटख्याचे पोते लंपास करणाऱ्या सहा जणांविरुद्ध  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी नामे- सय्यद सिराजोद्दीन सय्यद फयाजोद्दीन ( वय 36 वर्षे )  रा. मुलगा मठ , जोशी गल्ली,  हुमनाबाद जि. बिदर राज्य कर्नाटक हे त्यांची ट्रक क्र के. ए. 56 -0237 मध्ये पान मसाला भरुन घेवून गुजरात येथे जात होते. दरम्यान आरोपी नामे-1) मिट्टू रणजितसिंग ठाकुर 2) रोहित राठोड दोघे रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव व त्यांच्या सोबत अनोळखी चार इसम यांनी नळदुर्ग ते तुळजापूर जाणारे रोडवर गोलाई चौकाचे पुढे आल्यावर फिर्यादी यांचे ट्रकच्या पुढे पांढऱ्या रंगाची स्कारर्पीओ गाडी आडवी लावून सय्यद सिराजोद्दीन यांचे अंगावर मिर्ची पुड टाकली. व गळ्याळा कोयता लावुन लाथाबुक्यानी, फायबरच्या काठीने मारहाण केली. 

सय्यद सिराजोद्दीन यांचा चुलत भाउ सय्यद फैराद सय्यद करीम यांना डोक्यात मारहाण करुन सय्यद सिराजोद्दीन व त्यांच्या चुलत भाउ फैराद सय्यद यांना स्कार्पीओ गाडीमध्ये जबरदस्तीने टाकुन घेवून जावून स्वताचे आर्थीक फायद्यासाठी दहशत निर्माण करुन फिर्यादीच्या ताब्यातील ट्रक क्र के. ए. 56 -0237 व ट्रक सह सुपर पान मसाला चे 50 मोठे पोते, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम 5,000 पिवळ्या रंगाची ताडपत्री असा एकुण 30,30,200₹ किंमतीचा माल हा जिवे मारण्याची धमकी देवून बळजबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या सय्यद सिराजोद्दीन यांनी दि.30.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 395,386,364(ए),341, 342 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हुमनाबाद  येथे गुटख्याचे अनेक कारखाने असून, येथील गुटखा संपूर्ण महाराष्ट्रात उमरगा, नळदुर्ग मार्गे पुढे जातो. गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर दरोडा टाकून त्यातील माल लुटून नेणाऱ्या अनेक टोळ्या नळदुर्ग, तुळजापूर, उमरगा, सोलापूर येथे कार्यरत झाल्याच्या बातम्या यापूर्वी धाराशिव लाइव्हने दिल्या होत्या. नळदुर्गजवळील घटनेत खरे सूत्रधार कोण आहेत ? याचा छडा पोलिसांनी लावावा, अशी मागणी होत आहे. 

गुटख्याच्या वाहनावर दरोडा पडल्यानंतर त्याची फिर्याद आजपर्यंत नोंद केली जात नव्हती, मात्र धाराशिव लाइव्हच्या बातमीनंतर आता असे गुन्हे नोंदवले जात असून, गुटखा नेणाऱ्यांवर आणि गुटखा लुटणाऱ्यावर गुन्हे दाखल केल्यास अश्या प्रकाराला पायबंद बसू शकेल, असे जनतेचे मत आहे.