नळदुर्ग : लुटीच्या कारसह दोघे 48 तासात अटकेत 

 

उस्मानाबाद  : आंध्रप्रदेशातील रहिवाशी चालक -फजल शेख हे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 02.30 वा टाटा झेस्ट कार क्रमांक टी एस 07 यु एच 2690 मधुन दोन अनोळखी पुरुषांना घेउन जात होते. नळदुर्ग शिवारातील चिकुंद्रा पुलाजवळ कार आली असता नमुद दोघांनी चालक शेख यांना दमदाटी करुन शेख यांच्या खिशातील 6,000 ₹ व भ्रमणध्वनीसह नमुद कार लुटुन नेली होती. यावर फजल शेख यांनी नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- 392, 34 नुसार गुन्हा क्र. 384 / 2021 हा दि. 21 नोव्हेंबर रोजी नोंदवला आहे.

            सदर गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, जगदाळे, शेळके, कवडे, पोकॉ- ढगारे, ठाकुर यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा सविस्तर अभ्यास केला. यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व्हर्टी, ता. तुळजापूर येथील चेतन चंद्रकांत राजमाने व हिंजवडी, पुणे येथील विशाल राजेंद्र मिश्रा या दोघा आरोपींना आज दि. 23 नोव्हेंबर रोजी व्हर्टी येथून ताब्यात घेण्यात आले. लुटीच्या मालातील टाटा झेस्ट कारसह गुन्हा करण्यास वापरलेली  आरोपींनी वापरलेली ह्युंडाई कार क्र. एम.एच. 12 एनएक्स 3260 त्यांच्या ताब्यातून जप्त करुन उर्वरीत कारवाईसाठी त्यांना नळदुर्ग पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. 


मारहाणीचे दोन गुन्हे 

वाशी  : आंद्रुड, ता. भुम येथील भास्कर पांडुरंग लिमकर यांनी ग्रामस्थ- राधा ओव्हळ यांच्या सासऱ्यास 6,000 ₹ उसणे दिले होते. राधा यांचे सासरे मयत झाल्याने भास्कर लिमकर हे राधा यांच्याकडे त्या रकमेचा तगादा लावत होते. यातून दि. 20.11.2021 रोजी 18.00 वा. सु. राधा ओव्हाळ या त्यांच्या घरात असताना भास्कर लिमकर यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची  धमकी दिली. अशा मजकुराच्या राधा ओव्हाळ यांनी दि. 22 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : परंडा येथील लतीफ इसाक कुरेशी हे दि. 21.11.2021 रोजी 10.30 वा. सु. एका व्यक्तीला भेटण्यासाठी गावातील मोरे रुग्णालयात गेले. संबंधीत व्यक्ती तेथे नसल्याने कुरेशी यांनी डॉ. आनंद मोरे यांना त्याचा ठावठिकाणा, भ्रमणध्वनी क्रमांक मागीतला असता वाद निर्माण झाला. यात डॉ. मोरे यांसह त्यांची पत्नी व पिता अशा तिघांनी कुरेशी यांना शिवीगाळ करुन हातातील कड्याने, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या 22 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.