भूम : भाविक महिलांचे अडीच तोळे दोन भामट्यांनी लुटले

सीसीटीव्ही कॅमेरात भामटे कैद 
 

भूम - चोरी, लुटालूट यामध्ये सराईत व निपून असलेल्या दोन भामट्यांनी महिला भाविकांना आमची आई आजारी असून आम्हाला पैसे व सोने देवाला दान करायचे आहे. आमच्याकडे पैसे आहेत. परंतू सोने नाही. त्यामुळे आम्ही ठेवलेल्या पैशावर तुमच्या जवळील सोने थोडावेळ ठेवा व नंतर लगेच परत घ्या, अशी थाप मारुन त्या भामट्यांनी भाविक महिलांकडील अडीच तोळे सोने लुटून पोबारा केल्याची घटना दि.२० रोजी घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भूम येथे देवाची पूजा व पैसे दान करण्याचा बहाणा करून सुमारे अडीच तोळे सोने लुटल्या ने भूम शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील  हिरकना नारायण जाधव या रथ गल्ली परिसरातील ओंकार पतसंस्था  समोर रत्‍नाबाई स्वामी यांच्या सोबत दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बोलत बसल्या होत्या .

यावेळी फटफटीवर अज्ञात दोन तरुण त्यांच्याजवळ येऊन थांबले व तरुणांनी आमची आई आजारी आहे, आम्हाला देवाला पैसे दान करायचे आहेत व हे  दान एका महिलेच्या हातून करायचे आहे, असे सांगून मंदिरात नेले व  तिथे गेल्यानंतर त्या दोन युवकांनी त्यांच्याकडील ५०० रुपये पूजेसाठी तेथे काढून ठेवले. त्यावर एका युवकाने पूजेसाठी सोने लागायचे आहे व आमच्याकडे सोने नाही. तुमच्या जवळील सोने त्या पैशावर ठेवा आणि पूजा झाली की लगेच तुमचे सोने परत घ्या, असे त्या महिलांना सांगून त्या महिलेचा विश्वास संपादन केला. सोने पैशावर ठेवून त्या महिलांना दर्शन घेण्यास सांगितले. 

त्या दर्शन  घेण्यास गेल्या असता त्यांना त्या ठिकाणी पैसे किंवा सोने आढळून आले नाही. त्या ठिकाणी वाहिलेली फुले दिसून आली. ते दोन युवक मंदिरात कोठेही दिसून आले नाहीत. सोन्याची चोरी करून चाललेले ते दोन युवक सीसीटीवीमध्ये कैद झालेले दिसून आलेले आहेत. पुढील तपास पोहकॉ शेख हे करीत आहेत.