शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी उमेश बिराजदार मोकाट 

गुन्हा दाखल होवून दहा दिवस झाले तरी लोहारा पोलीस मूग  गिळून गप्प 
 

लोहारा : शेतालगत असलेला रस्ता दार- कुलूप लावून बंद करुन शेतात येण्या- जाण्याला अडथळा केला म्हणून चिंचोली (काटे), ता. लोहारा येथील आबाजी मुरलीधर बिराजदार यांनी दि. १९ ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या  घरात आत्महत्या केली होती.याप्रकरणी जिल्हा कृषी अधिकारी उमेश बिराजदार यांच्यासह सहा जणांविरुद्ध लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होवून दहा दिवस झाले तरी लोहारा पोलीस आरोपीना अटक करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


चिंचोली (काटे), ता. लोहारा येथील आबाजी मुरलीधर बिराजदार यांनी दि. 19.08.2021 रोजी 18.30 वाजता  घरात आत्महत्या केली होती. आबाजी बिराजदार व तावशीगड, ता. लोहारा येथील उमेश बाबुराव बिराजदार यांच्यात शेत रस्ता रहदारी संबंधी वाद होता. मागील काही दिवसापुर्वी प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी उमेश बिराजदार यांनी त्यांच्या शेतालगत असलेला रस्ता दार- कुलूप लावून बंद करुन आबाजी यांस शेतात येण्या- जाण्याला अडथळा केला. तसेच उमेश यांसह गावकरी- कमलबाई पवार, दादासाहेब पवार, पांडुरंग गिरी, अनंत गिरी, इंदुबाई गिरी अशा सहा जणांनी आबाजी यांच्या घरी जाउन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यांच्या या त्रासास कंटाळून आबाजी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- सविता बिराजदार यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 341, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

घटना घडल्यानंतर तब्बल २० दिवसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आता गुन्हा दाखल होवून दहा दिवस झाले तरी लोहारा पोलीस आरोपीना अटक करीत नसल्याने उलट सुलट चर्चा सुरु आहे. 

वरिष्ठांचा कसला हो आदेश ? 

या संदर्भात प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील काकडे, यांच्याशी संपर्क साधला असता, हा केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा आहे. यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून तपास करण्यासाठी अटक केलेली नाही. हा तपासाचा भाग असल्यामुळे याबाबत अधिक माहिती सांगू शकत नाही म्हणाले. 

वरिष्ठांचा कसला आदेश या आहे, हे कळू शकेल का काकडे साहेब ? असा सवाल जनता विचारत आहे.