धाराशिव : वसंतदादा नागरी बँक घोटाळ्यातील आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय सिताराम दंडनाईक, व्यवस्थापक दिपक देवकते यांच्यासह तत्कालिन संचालक मंडळ, बँकेतील कर्मचारी यांच्यावर ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती व फसवणूक मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, बँकेचे तत्कालिन व्यवस्थापक दीपक देवकते यांच्यासह तत्कालिन संचालक मंडळाने अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अटकपूर्व जामीन अर्ज . जिल्हा व सत्र न्यायाधीश बागे पाटील यांनी फेटाळून लावला आहे.
काय आहे प्रकरण ?
धाराशिव शहरातील प्रभात सहकारी पतपेढीला वसंतदादा बँकेने मुदत ठेवीवर जास्त व्याजाचे अमिष दाखवून ठेवी ठेवण्यास भाग पाडले. ठेवीची मुदत पूर्ण होवुन देखील मुदत ठेवीची १ कोटी ८१ लाख रूपये व व्याज असे एकूण २ कोटी ३१ लाख ६८ हजार ४७२ रूपयांचे आर्थिक नुकसान केले.
प्रभात पतपेढीचे शाखा व्यवस्थापक विनोद वडगावकर यांची व इतर ठेवीदारांचा विश्वासघात करुन फसवणूक केली. या प्रकरणी भा.दं.वि.सं. कलम- ४२०, ४०९, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम ३, ४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती व फसवणूक रक्कम जास्त असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, धाराशिव यांचेकडे देण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोनि संतोष शेजाळ करीत आहेत.
जामीन अर्ज फेटाळला
घोटाळ्याच्या या प्रकरणात सर्व आरोपी संचालक यांच्या वतीने ऍड अमोल वरुडकर तर सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ऍड शरद जाधवर यांनी बाजू मांडली. आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे स्वतः सुनावणीसाठी कागदपत्रासह हजर होते. जवळपास 20 ठेवीदार यांनी कोर्टात हजर होत त्यांची कशी फसवणूक झाली हे वकीलामार्फत सांगितले.
संचालक असलेले ऍड बिराजदार, गणेश दत्ता बंडगर, गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, रामलिंग करजखेडे, सी ए असलेले भीमराव ताम्हाणे, पृथ्वीराज विजय दंडनाईक, विष्णुदास रामजीवन सारडा,कमलाकर आकोसकर, शुभांगी प्रशांत गांधी, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे, सुरेखा विजय दंडनाईक, लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा या 18 जणांचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे.
लायसन्स रद्द
वसंतदादा बँकेने दि. ३ ऑगस्ट २०११ ते १७ जुलै २०१९ या कालावधीत कर्जासाठी पुरेशे तारण न घेता बेकायदेशीररित्या कर्ज वाटप केले. त्या कर्जाच्या रकमा चेअरमन व त्यांचे नातेवाईक यांच्या फायद्यासाठी त्यांचे स्वत:चे खात्यावर घेवून स्वत:साठी वापरल्या. तसेच कर्ज वाटपाची वसुलीही करण्यात आलेली नाही.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बॅंकेचं लायसन्स रद्द केलं आहे, वसंतदादा नागरी सहकारी बॅंकेला आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.