ऑनलाईन  गेममध्ये हरलेल्या पैशांच्या परतफेडीसाठी चिमुकल्याचा घेतला जीव

आरोपी १७ वर्षाचा , सांगवी (मार्डी) मध्ये थरकाप उडवणारा खून 
 

तुळजापूर  : सांगवी (मार्डी), ता. तुळजापूर येथील ओम मनोज बागल हा 5 वर्षीय मुलगा दि. 16.12.2021 रोजी 13.00 ते 13.30 वा. दरम्यान आपल्या घरासमोरील अंगणात असतांना बेपत्ता झाल्याने पिता- मनोज विठ्ठल बागल यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत अपहरनाचा गुन्हा काल दि. 16 डिसेंबर रोजी नोंदवण्यात आला होता. आज सकाळी त्या बालकाचा मृतदेह त्याच्या घराजवळील एका घरात आढळून आला असता त्या बालकाचा दोरीने गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले. या प्रकरणी तुळजापूर पोलीसांनी परिसरातील एका 17 वर्षीय मुलास  संशयावरून ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.

अाॅनलाइन गेमच्या व्यसनापायी एका अल्पवयीन मुलाने पैसे हरले. याची भरपाई करण्यासाठी घरातून वडिलांचे पैसे चोरले खरे; पण वडील मारतील या भीतीपोटी त्याने शेजारील पाचवर्षीय मुलाची सोन्याची कुंडले काढून घेत त्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघड झाला. धक्कादायक म्हणजे गुन्हा दडपण्यासाठी रात्रभर त्याने क्राइम पेट्रोलची मालिका पाहिली असल्याची कबुलीही पोलिसांना दिली आहे. 


ओम गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तापाची गोळी आणायला म्हणून घराबाहेर पडला होता. त्यानंतर अचानक तो गायब झाला होता. कुटुंबीयांनी शोधाशोध केली तरी तो सापडला नव्हता. शुक्रवारी सकाळी शेजारच्या एका पडक्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला. या वेळी ओमच्या कानातली सोन्याची कुंडले गायब होती. तसेच त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक निवा जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील, पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. अखेरीस शेजारील अल्पवयीन मुलगा व त्याचे वडील दिलीप बागल व आई वंदना बागल या तिघांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. ओमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत संशयितांची पोलिस चौकशी करत होते.

चिमुकल्याचा खून करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे वडील दिलीप बागल हे सैन्यात मेजर आहेत. ऑनलाइन गेममध्ये हरलेल्या पैशांची भरपाई करण्यासाठी त्या अल्पवयीन मुलाने वडिलांचे पैसे चोरले होते. पण ते मारतील या भीतीने पैसे आणायचे कुठून, या तणावात तो होता. त्याच वेळी ओमच्या कानातील सोन्याची कुंडले त्याला दिसली. ती काढण्यासाठी आधी त्याने ओमला जोरात चापट मारली. यात तो बेशुद्ध पडला. तो शुद्धीवर आला तर आपले पितळ उघडे पडेल हे लक्षात येताच त्याने लेस आणून गळा आवळून चिमुकल्याचा खून केला. आपण केलेला गुन्हा कुणाच्याही समोर येऊ नये म्हणून त्याने गुरुवारी रात्रभर क्राइम पेट्रोल मालिका पाहिल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी लेस व सोन्याची कुंडले ताब्यात घेतली आहेत.


बागल कुटुंबात ओम (५) आणि त्याची तीन वर्षांची लहान मुलगी होती. ओमचा दोन दिवसांनी म्हणजे सोमवारी (२० डिसेंबर) पाचवा वाढदिवस होता. तो धूमधडाक्याने साजरा करण्याची तयारी सुरू होती. यासाठी ओमच्या वडिलांनी ५ किलोच्या केकची ऑर्डर दिली होती. मात्र, वाढदिवसापूर्वीच त्याचा गळा घोटण्यात आला.