ऑनलाईन फसवणूक व घरफोड्या टाळण्यासाठी दक्ष राहा 

पोलीस अधीक्षक नीवा जैन यांचे आवाहन 
 

उस्मानाबाद  - दिवाळीमुळे ऑनलाईन फसवणूक व घरफोड्या होण्याची शक्यता आहे , त्यामुळे नागरिकांनी  दक्ष राहण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी केले आहे. 


सध्या दिवाळीच्या निमीत्ताने अनेक लोक घरे कुलूप बंद करुन बाहेर गावी जात आहेत. अशा बंद घरांवर चोरट्यांची विशेष नजर असल्याने अशा बंद घरात चोरी होण्याची शक्यता असते.त्यामुळे बाहेर गावी जाताना मौल्यवान दागिने, रोख रकमा या अशा बंद घरात न ठेवता नातेवाईक, बँक लॉकर यांत सुरक्षीत ठेवाव्या किंवा सोबत घेउन जाव्यात. शक्य असल्यास शेजारी / नातेवाईक यांना रात्रीच्या वेळीस आपल्या घरात झोपण्यास, लक्ष देण्यास सांगावे.परिसरातील लोकांनी आपले ग्रामसुरक्षा दल उभारुन आपल्या वस्तीत रोज आळीपाळीने गस्त करावी. अशा गस्तीदरम्यान कुलूप बंद घरांवर विशेष लक्ष द्यावे तसेच शक्य असल्यास आपापल्या घरी सीसीटीव्ही यंत्रनेचा वापर करावा.     

 ऑनलाईन खरेदीतील नापसंत वस्तू परत केल्यावर त्याची रक्कम परत मिळण्यासाठी  त्या विक्रेत्याचा ग्राहक सुविधा केंद्र संपर्क क्रमांक अधिकृत संकेतस्थळावरुनच प्राप्त करावा. इंटरनेटवर अन्यत्र उल्लेख केलेले संपर्क क्रमांक हे फसवे असू शकतात आणि त्यातून ग्राहकांची लूट होण्याचे शेकडो  प्रकार आजपावेतो घडलेले आहेत. 

याकरीता ग्राहक सुविधा केंद्राशी दुरध्वनी संपर्क साधताना आपल्या क्रेडीट / डेबिट कार्ड वरील अंक, सीव्हीव्ही कोड इत्यादींसह आपल्या भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी क्रमांक अशी गोपनीय माहिती समोरील अज्ञातास सांगू नका.तसेच अनोळखी व्यक्तीने एनीडेस्क, टीमव्युवर इत्यादी ऑनलाईन ॲपलीकेशन मोबाईलमध्ये घेण्यास सांगीतले असता तसे करणे टाळावे. असे ॲपलीकेशन डाऊनलोड करुन त्यातील संकेतांकसमोरील व्यक्तीस सांगताच आपली व्यक्तीगत बँक खाते विषयक माहिती समोरील अज्ञातास उपलब्ध होउन आपले बँक खाते रिकामे होउ शकते. असे आवाहन  पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांनी जनतेस केले आहे.