२० हजार लाच घेणारा लोहारा पोलीस स्टेशनचा पोलीस चतुर्भुज 

 

उस्मानाबाद -  एका ३० वर्षीय व्यक्तीवर लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र त्यास अटक न करणे,  लॉकअपमध्ये न टाकणे चार्जशीट न पाठविता फायनल पाठविण्यासाठी लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईकाने २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तडजोडी अंती २० हजार रुपयांची लाच स्विकारताना पंचा समक्ष त्या लाचखोर लोवसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांच्या पथकाने दि.४ ऑगस्ट रोजी रंगेहात पकडून गजाआड केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक न करणे, लॉकअपमध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे व फायनल पाठवण्यासाठी यातील लोकसेवक १२४७/पोलिस नाईक गोरोबा बाबासाहेब इंगळे (वय- ३५) याने तक्रारदार यांच्याकडे दि.३ ऑगस्ट रोजी २५ हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती २० हजार रुपये घेण्याचे कबूल करुन दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.५५ वाजण्याच्या सुमारास लोहारा ते जेवळी रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ २० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली. 

यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचखोर इंगळे यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ही यशस्वी कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे च्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथील पोलिस उपअधीक्षक व सापळा अधिकारी  प्रशांत संपते यांनी केली. या सापळा पथकामध्ये पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, जाकेर काझी यांचा समावेश होता. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते मो.नं. ९५२७९४३१००, पोलिस निरीक्षक अशोक हुलगे मो.नं. ८६५२४३३३९७, विकास राठोड मो.नं.  ७७१९०५८५६७ व कार्यालय- ०२५७२-२२२८७९ या नंबर वर संपर्क साधावा, असे  आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.