साहेबासाठी २० हजार आणि स्वतःसाठी ५ हजार लाच घेणाऱ्या  भूमचा पोलीस एसीबीच्या जाळ्यात 

 

उस्मानाबाद -  बिअर बारच्या  लायसन्ससाठीआवश्यक असलेल्या चारित्र्य प्रमाणपत्र देण्यासाठी साहेबांसाठी २० हजार व स्वतःसाठी ५ हजार‌ रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या भूमच्या एका पोलिसास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचून पंचासमक्ष रंगेहात पकडले. 

भूम तालुक्यातील एका ३६ वर्षीय तक्रारदाराच्या भावाचे बिअर बार परमिट रुमचे लायसन्स  मिळण्यासाठी चारित्र्य पडताळणी करून स्पॉट पाहणी अहवाल विनात्रुटी भूम येथील पोलिस उप अधीक्षकांना सादर करण्यासाठी भूम पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक (बक्कल नं.१४०१) गणेश रमाकांत देशपांडे यांनी तक्रारदारांना पोलिस निरीक्षक सुरवसे यांच्यासाठी २० हजार रुपये व स्वतःसाठी ५ हजार रुपयांची लाच अशी एकून २५ हजार रुपये लाचेची मागणी दि.११ जुलै रोजी पंचांसमक्ष केली होती.या लाचखोर पोलिसास एसीबी पथकाने सापळा रचून अटक केली. 

 ही कामगिरी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ राहुल खाडे,अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे,उस्मानाबाद येथील पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  विकास राठोड यांनी सापळा रचून यशस्वी केली. या सापळा पथकामध्ये पोलिस अंमलदार इफतेकर शेख, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सचिन शेवाळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.