मुलीच्या शिक्षणाची फिस भरण्यासाठी बँकेतून काढलेले १ लाख ६० हजार चोरट्याने पळविले 

उमरगा शहरात भरदिवसा प्रकार 
 

उमरगा - शहरात गुरुवारी दि.27 रोजी भरदिवसा मुलीच्या शिक्षणाची फिस भरण्यासाठी,बँकेतून एक लाख 60 हजार रुपये काढून गावी मोटारसायकल निघण्याच्या तयारीत असताना, अज्ञात चोरट्यानी महिलेच्या हातात पैसे आसलेली पर्स हिसकावून, दुचाकीवरून पसार झाल्याने एकच खळबळ उडाली.यावेळी संबधित महिलेच्या पतीने गाडीवर चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण चोरटे पसार झाले.

सविस्तर वृत्त असे की,शहरातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँकेतून, मुलीच्या शिक्षणासाठी पैसे काढण्यासाठी तालुक्यातील बेडगा येथील शेतकरी सुधीर पाटील हे आपल्या पत्नीसह 12 च्या सुमारास आले होते.पत्नी रागिणी सुधीर पाटील यांच्या खात्यावरील एक लाख साठ हजार काढून ते पैसे आपल्या पर्स मध्ये ठेवले.त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास ते गावी जाण्यासाठी बँकेतून बाहेर पडले. बाहेर रस्त्यावर लावलेल्या दुचाकी जवळ आले असता, अचानक पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने रागिणी पाटील यांच्या हातात असलेली पर्स हिसकावून पसार झाले.

यावेळी रागिणी पाटील यांनी आरडाओरड केली तर त्यांचे पती सुधीर पाटील हे आपल्या दुचाकीवर चोरट्यांचा पाठलाग केला.चोरटे हे शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून शिवाजी कॉलेजच्या पुढून दिसेनासे झाले.त्यानंतर सुधीर पाटील हे परत बँकेकडे येवून बँकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देवून बँके बाहेरील व आतील सीसीटिव्ही फुटेज तपासले. तसेच त्यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली.रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.