आधार कार्ड-पॅनकार्ड लिकिंग करण्यास मुदतवाढ ; आता शेवटची तारीख जाणून घ्या... 

 

नवी दिल्ली :  पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख केंद्र सरकारने वाढवली आहे. देशातील नागरिक आता 30 जून 2023 पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करु शकतात. त्यामुळे देशातील लाखो लोकांना फायदा होणार आहे.

आत्तापर्यंत, पॅनशी आधार लिंक करण्याची तारीख 31 मार्च 2023 होती, मात्र आता ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) मार्फत पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख यापूर्वी अनेकदा वाढवण्यात आली आहे.आयकर विभागाने सातत्याने पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याबाबत पाठपुरावाही केला. IT कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांना, जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत, त्यांनी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे, अन्यथा लिंक न केलेला पॅन निष्क्रिय होईल.

देशातील दुर्गम, खेड्यातील अनेक लोकांनी हे दोन्ही कार्ड जोडलेले नाहीत. गेल्यावर्षी ही प्रक्रिया शुल्क मुक्त होती. पण जून महिन्यानंतर ही सेवा सशुल्क करण्यात आली. सुरुवातीला 500, त्यानंतर 1000 रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याने अनेक नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली. ग्रामीण भागात तर दलालांचे पण रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला होता. त्यांनी एक आठवड्यापूर्वी पॅनकार्ड-आधार जोडणीला मुदतवाढ देण्याची आणि ही जोडणी निशुल्क करण्याची विनंती केली होती.


केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अखेर आधार कार्ड-पॅनकार्ड जोडणीला मुदतवाढ दिली. गेल्यावर्षी निश्चित केल्याप्रमाणे ही मुदतवाढ 31 मार्च 2023 ही होती. आता ही तारीख वाढवून 30 जून, 2023 करण्यात आली आहे. सीबीटीडीनुसार, ही जोडणी करण्यासाठी नागरिकांना थोडी मुभा देण्यात आली आहे. ज्यांनी आतापर्यंत ही जोडणी केली नाही. त्यांनी 30 जूनपर्यंत ही जोडणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पाचवेळा मुदतीत वाढ करण्यात आली आहे.


आता ही शेवटची संधी नागरिकांना देण्यात आली आहे. जर त्यांनी 30 जूनपर्यंत ही जोडणी केली नाही तर त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. त्यांना पुन्हा जोडणीची संधी देण्यात येणार नाही. पॅनकार्ड निष्क्रिय झाल्याबरोबर त्यांचे बँक खाते, डीमॅट खाते इतर ठिकाणाचा व्यवहार ठप्प होईल. त्यांना व्यवहार करताना अडचणी येतील. त्यामुळे या अंतिम मुदतीपूर्वी आधार कार्ड आणि पॅनकार्डची जोडणी करणे आवश्यत आहे. पण केंद्र सरकारने शुल्क माफीबद्दल एक चकार शब्दही काढला नाही.


तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले आहे की नाही, याविषयी शंका असेल, तर घरबसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करता येईल. त्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे लागेल.

  • स्टेप 1: सर्वात अगोदर, आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे. त्यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर क्लिक करावे लागेल
  • स्टेप 2: याशिवाय तुम्हाला 10 आकड्यांचा पॅन क्रमांक आणि 12 आकडी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर व्ह्यू लिंकवर जाऊन आधार स्टेटवर क्लिक करावे लागेल.
  • स्टेप 3:: त्यानंतर तुमचा 10 अंकी पॅन कार्ड क्रमांक आणि 12 अंकी आधार क्रमांक टाका, त्यानंतर व्ह्यू लिंकवर आधार स्टेट्सवर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक अगोदरच लिंक असेल तर आधार क्रमांक दिसेल. तुमचा आधार क्रमांक अपडेट नसेल तर तुम्हाला लिकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • स्टेप ४ : आयकर विभागाने एसएमएसच्या माध्यमातून पॅन-आधारकार्ड लिकिंग स्टेट्स चेक करण्याचा पर्याय दिला आहे. त्यासाठी करदात्यांना 567678 अथवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवणे आवश्यक आहे. जर दोन्ही कार्ड जोडण्यात आले असतील, तर त्याची माहिती तुम्हाला मिळेल.
  • स्टेप ५ :एसएमएस फॉर्मेट असा असेल : UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन कार्ड क्रमांक>