धाराशिव लाइव्हने उघडकीस आणलेला झेडपीतील पदभरती घोटाळा हिवाळी अधिवेशात गाजणार 

आ. सुरेश धस यांचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांना पत्र 
 
जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओकडून अहवाल मागितला 

धाराशिव  - धाराशिव जिल्हा परिषदेच्या  आरोग्य विभागातील पदभरती घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर व दोषींना पाठीशी घालणाऱ्यावर कडक कारवाई करून त्याचा सविस्तर अहवाल विधी मंडळ कामकाजासाठी हिवाळी अधिवेशन २०२३ पूर्वी देण्यात यावा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांच्याकडे केली आहे. 

काय आहे प्रकरण ? 

राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) च्या वतीने कंत्राटी पदाची पदभरती करण्यासाठी  एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात  एमपीडब्लू ( पुरुष ) यांच्या १८ तर स्टाफ नर्स यांच्या १७ जागा निघाल्या होत्या.  सदर भरती करताना लेखी परीक्षा न घेता थेट तोंडी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. एमपीडब्लू ( पुरुष ) जागेसाठी सॅनिटरी इन्फेक्टर कोर्सची आवश्यकता आहे.  ज्या उमेदवारांनी सॅनिटरी इन्फेक्टर  कोर्सची प्रमाणपत्रे  जोडली आहेत त्यातील अनेकांची  प्रमाणपत्रे बोगस आहेत. त्यांनाही पात्र ठरवण्यात आले आणि एक ते दोन लाख घेऊन ही भरती करण्यात आली.


याप्रकरणी  धाराशिव ( उस्मानाबाद ) लाइव्हने २८ ऑक्टोबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची राज्याचे तत्कालीन आयुक्त ( आरोग्य विभाग ) तुकाराम मुंडे यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी एक पत्रक काढून उमेदवारांना पैसे न देण्याचे जाहीर आवाहन केले आहे. पण  उमेदवारांनी डॉ. किरण गरड जिल्हा कार्यक्रम  व्यवस्थापक, राज्य आरोग्य अभियान, धाराशिव यांच्याकडे अगोदरच पैसे दिले होते आणि ही भरती वशिल्याने आणि ज्यांनी पैसे दिले त्यांची करण्यात आली. 

धाराशिव झेडपीच्या आरोग्य विभागातील पदभरती घोटाळा प्रकरणी एकाचा राजीनामा


या भरतीची सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी माहितीच्या अधिकारात  माहिती मागितली असता, अनेक गंभीर  बाबी निदर्शनात आल्या. त्यानंतर प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी, आरोग्य विभागात वसुली करणाऱ्या  डॉ.  किरण गरड , जिल्हा कार्यक्रम  व्यवस्थापक, राज्य आरोग्य अभियान, धाराशिव यांचा  राजीनामा घेतला आहे. गरड यांनी  जवळपास ५० ते ६० लाख  रुपये घेतल्याचे समोर आले आहे. 


वास्तविक  डॉ. गरड यास निलंबित करून, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतःवरची जबाबदारी झटकून टाकली आहे. डॉ. किरण गरड यांनी तोंड  उघडल्यास जिल्हा परिषदेचे अन्य वाटेकरी समजू शकतात. मोठे मासे वाचवण्यासाठी एका छोट्या माश्याचा बळजबरीने बळी देण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य विभागात घोटाळे उघडकीस येत आहेत, हे येथे उल्लेखनीय.  

जि. प. आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कंत्राटी पदाची पदभरतीमध्ये महाघोटाळा

दोषींवर आणि दोषींना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई  करा - आ. धस 

धाराशिव जिल्हा परिषदेच्या  आरोग्य विभागातील पदभरती घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर व दोषींना पाठीशी घालणाऱ्यावर कडक कारवाई करून त्याचा सविस्तर अहवाल विधी मंडळ कामकाजासाठी हिवाळी अधिवेशन २०२३ पूर्वी देण्यात यावा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांच्याकडे केली आहे. 

त्यानंतर  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना  याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

यांचे हात झाले ओले 

धाराशिव लाइव्हने जिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळा उघडकीस आणल्यानंतर डॉ. किरण गरड ( जिल्हा कार्यक्रम  व्यवस्थापक, राज्य आरोग्य अभियान ) यांचा राजीनामा घेण्यात आला पण  त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच मुख्य अधिकरी अधिकारी राहुल गुप्ता यांनी डॉ. किरण गरड  यांचा राजीनामा घेतल्यानंतर जिल्हा कार्यक्रम  व्यवस्थापक, राज्य आरोग्य अभियान हे पद न भरता रिक्त ठेवून, जिल्हा लेखा व्यवस्थापक जीवन कुलकर्णी यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला आहे. विशेष म्हणजे डॉ. किरण गरड आणि जीवन कुलकर्णी यांच्यात भरतीचे  पैसे वाटपावरून हाणामारी झाली होती,त्याची बातमी देखील धाराशिव लाइव्हने यापूर्वी दिली आहे. 

ही पदभरती करतेवेळी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडखे हे रजेवर होते. या घोट्याळ्यात मुख्य अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, डॉ. किरण गरड ( जिल्हा कार्यक्रम  व्यवस्थापक, राज्य आरोग्य अभियान ) आणि लेखा व्यवस्थापक जीवन कुलकर्णी यांचे हात ओले झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. या भरतीची सखोल चौकशी करून, दोषी आणि दोषींना पाठीशी घालणाऱ्यावर कडक कारवाई  करावी, अशी मागणी होत आहे.