तेरखेड्याच्या विधवा आणि गरीब महिलेस एका महिन्याचे विजेचे बिल ४४ हजार 

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आर्थिक संकट 
 

तेरखेडा - महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार जनतेला नवा  नाही. वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील एका विधवा महिलेस ऑगस्ट महिन्याचे विजेचे बिल चक्क  ४३ हजार ९१८ रुपये आले होते. तक्रार केल्यानंतर आता १० हजार १५० रुपये देण्यात आले आहे. एका महिन्याचं इतके बिल येतेच कसे ? याचे सर्वाना कोडे पडले आहे. 

शीतल महादेव सरवदे असे या विधवा महिलेचे नाव आहे. तेरखेड्याच्या फटका कारखान्यात मोलमजुरी करून जगणाऱ्या शीतल सरवदे यांचे फक्त दोन रूमचे घर आहे. घरात दोन बल्ब, एक फॅन आणि एक टीव्ही आहे. महिन्याला फार तर तीनशे  ते साडेतीनशे रुपये विजेचे बिल येणे अपेक्षित असताना चक्क ४३ हजार ९१८ रुपये बिल आले. बीडमध्ये राहणाऱ्या एका भावाने तक्रार केल्यानंतर ते आता  १० हजार १५० रुपये करण्यात आले आहे. इतके बिल भरावे कसे ? असा प्रश्न शीतल महादेव सरवदे यांना पडला आहे. 

शीतल सरवदे यांनी एका महिन्यात ३०१४ युनिट वीज वापरल्याचा शोध महावितरने लावला आहे. नंतर मीटर फॉल्ट असल्याचे सावरासावर करून  बिल कमी केले असले तरी १० हजार १५० रक्कम देखील अधिक आहे. 

पती महादेव सरवदे यांचे तेरखेड्याच्या फटका कारखान्यात झालेल्या स्फोटात निधन झाले होते. आता शीतल सरवदे यांच्यावर महावितरणने आणखी एक संकट आणले आहे.याची दखल कोण घेणार का ? असा सवाल आहे.