प्रेम शिंदे मृत्यू प्रकरणी वाखरवाडी ग्रामसभेचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द 

उपविभागीय दंडाधिकारी खरमाटे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीसमोर पालकांकडून पुरावे सादर 
 

धाराशिव - वाणेवाडी येथील काका उंबरे  याच्या  आध्यत्मिक आश्रमशाळेत  शिकणाऱ्या  वाखरवाडीच्या प्रेम शिंदे या विद्यार्थास बेदम मारहाण करून त्यास गळफास देणाऱ्या पाच आरोपीना ढोकी पोलिसांनी अभय दिले असून, या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अन्यथा वाखरवाडीत  चूल बंद आंदोलन करण्यात येईल, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला होता. या ठरावाची प्रत  आज  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांना  देण्यात आली. 

दरम्यान, प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याच्या  संशयास्पद मृत्यू प्रकरणी  उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची चौकशी समिती गठीत  करण्यात आली आहे. त्यात जिल्हा शल्य चिकित्सक, गट विकास अधिकारी, एकात्मिक बाल  विकास अधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नायब तहसीलदार ( रोहयो ) विधी अधिकारी मसलेकर यांचा समावेश आहे. या समितीची पहिली बैठक आज दि. २२ ऑगस्ट रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी पार पडली. यावेळी मयत प्रेम शिंदे याचे वडील लहू शिंदे यांनी आपले म्हणणे मांडून सर्व  पुरावे सुपूर्द  केले. 

ग्रामसभेत  ढोकी पोलिसांवर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल तरडे यांची  गुन्हा घडल्यानंतर भूमिका संशयास्पद असून, तेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला पीएम रिपोर्ट देखील गोलमाल आहे. अंगावर अनेक जखमा असताना देखील रिपोर्ट व्यवस्थित दिलेला नाही. 

या प्रकरणी पाच आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला. पैकी तीन आरोपीना अटक करण्यात आली पण तिन्ही आरोपीना पोलिसांनी न्यायालयात पोलीस कस्टडी न मागता थेट न्यायालयीन कोठडी मागितली. यावरून या प्रकरणात आरोपी काका उंबरे  याने पैश्याचा वापर करून स्वतःचा आणि इतर आरोपीचा बचाव केला. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी,  सीआयडी चौकशी न झाल्यास वाखरवाडीत चूल बंद आंदोलन करण्यात येईल. 

या प्रकरणात ढोकी पोलीस निष्क्रिय ठरल्याने तपास ढोकी पोलिसाकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तसेच उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची चौकशी समिती गठीत  करण्यात आली आहे.  या प्रकरणी ढोकी पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.