उस्मानाबाद : गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार

 


उस्मानाबाद - भाजपच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त  स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा  सन्मान करण्यात आला. 


आज प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व.लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.


महात्मा गांधीजी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार याप्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नगर परिषद उस्मानाबादच्या अंतर्गत स्वछता कर्मचाऱ्यांना यावेळी पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर, मास्क, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अर्सेनिक अल्बम-३० गोळ्या व सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.  


स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती करणे यासोबतच जे प्रति दिवस हे कार्य करत आहेत त्यांच्याप्रती सद्भाव वाढवणे, त्यांच्या कार्याच्या प्रती संवेदनशील होणे, त्यांच्या कार्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हेदेखील महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे.स्वच्छतेच्या कार्याकडे प्रत्येक जण आस्थेने पाहू लागला, त्याविषयी जागृत राहून, सामाजिक भान राखत जगण्याची सवय लागली तर त्यासोबतच आरोग्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर मार्गी लागू शकतो.


सद्य परिस्थितीमध्ये, आरोग्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे वेगळे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.. आणि या कोरोना संसर्गाच्या काळात देखील ज्यांनी आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याचा धोका पत्करला, आणि जे आपल्या कर्तव्यावर ठाम राहून कार्यरत राहिले, अशा योध्यांचा सन्मान करणे आवश्यक ठरते. या सद्हेतूने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.


याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगर परिषद गटनेते युवराज नळे, . इंद्रजीत देवकते,  नितीन भोसले,  राजसिंह राजेनिंबाळकर, राहुल काकडे, श्री.  संदीप इंगळे, सुजित साळुंके,  श्रीराम भूमरे आदी उपस्थित होते.

उस्मानाबाद लाइव्हवरील ताजे अपडेट पाहण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.... 

खालील लिंकवर क्लिक करा... 

https://www.facebook.com/osmanabadlive