श्री तुळजाभवानी देवीची आज मुरली अलंकार महापूजा
तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव सुरु आहे. आज चौथी माळ आहे आणि मुरली अलंकार पूजा बांधण्यात आली आहे.
पार्वतीचे रूप म्हणजे तुळजाभवानी. हिला तुळजा, तुळजाभवानी, महिषासुर मर्दिनी, अंबाबाई अशी किती तरी नावे आहेत. तुळजाभवानी मातेने महिषासुर दैत्याचा वध केल्यानंतर सर्व ऋषी - मुनी त्रासातून मुक्त झाले, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपली मुरली देवीस अपूर्ण केली. त्यामुळे अश्विन शु. पंचमीला मुरली अलंकार पूजा बांधली जाते. देवीने मुरली वाजवल्यानंतर स्वर्गातील भयभीत देव - देवता स्वर्गप्राप्तीचा आनंद घेऊ लागले.
नवरात्र महोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी देवीचा शनिवारी रात्री तिसऱ्या माळेच्या दिवशी वाजत गाजत भक्तीभावाने छबिना काढण्यात आला.यावेळी तहसीलदार, पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 11 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 12 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 13 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
तत्पूर्वी, काल (शनिवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.तत्पूर्वी रात्री तिस-या माळेच्या दिवशी या वेळी उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार, पुजारी बांधव यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात गरूड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.