'बैल गेला अन् झोपा केला' म्हणल्यासारखी केंद्राची कार्यपध्दती - आ. कैलास पाटील

आता केंद्र सरकारने तात्काळ भरीव मदत करावी - आ. पाटील 
 

उस्मानाबाद - केंद्रीय पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांना सोमवारी  भेटी देऊन पाहणी केली आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ भरीव मदत करावी, अशी अपेक्षा शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 भेटीदरम्यान त्यानी आलेल्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती मांडुन नुकसानीची माहिती दिली.अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून  घेतला आहे. मुळातच पथक उशीरा आल्याने ही परिस्थिती दाखविता येणार नसल्याचे मतही आमदार कैलास पाटील यानी व्यक्त केले.

 'बैल गेला अन् झोपा केला' म्हणल्यासारखी केंद्राची कार्यपध्दती असल्याने किमान आता आल्यानंतर तरी वस्तुनिष्ट अहवाल देण्याची मागणी आमदार पाटील यानी यावेळी केली. बहुभुधारक शेतकऱ्यांच्या जमीनीचे भुस्कलन झाले असुन त्याची भरपाई केंद्राच्या जाचक अटीमुळे त्याना मदत मिळालेली नाही. हजारो शेतकरी यामुळे मदतीपासुन वंचित राहणार आहेत, त्यामुळे याबाबत काहीतरी ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आमदार कैलास पाटील यानी व्यक्त केली.

 या मदतीला दिरंगाई झाल्यास त्यांना पुढील हंगामात पिके घेता येणार नाहीत, त्याच्याबद्दल अधिक सहानुभुतीने पाहण्याची गरज असल्याचेही आमदार पाटील यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावुन आले असुन केंद्राकडुन अधिक अपेक्षा असतात. मात्र तिथेच दिरंगाई झाल्याने शेतकऱ्यांतुन तीव्र भावना व्यक्त होत आहेत, ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा दोन ते अडीच महिन्यानी घेतल्यानंतर काय दिसणार असल्याचा सवाल आमदार पाटील यानी उपस्थित केला. 

विमा कंपन्यानी व्ययक्तीक पंचनामा ग्राह्य धरुन त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पंचनामा करणे शक्य झालेले नाही. त्यांच्यासाठी महसुल विभागाकडुन करण्यात आलेले पंचनामे सुध्दा ग्राह्य धरल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणे अधिक सोयीचे होईल असेही आमदार कैलास पाटील यांनी पथकाच्या अधिकाऱ्यांना सुचविले आहे.विमा कंपन्याना त्या प्रकारचे आदेश दिले तर शेतकऱ्यांना त्याचाही फायदा होईल असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.