भोसले हायस्कुलची अनधिकृत इमारत पाडून के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हटवा 

सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांची  जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 
 

धाराशिव -  शहरातील भोसले हायस्कुलच्या प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा शासनाची मान्यता न घेताच शासनाच्या जागेत उभा करण्यात आलेला आहे. तसेच जागेबाबत  महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली आहे.त्यामुळे अनधिकृत तसेच अतिक्रमित इमारत पाडून  पुतळा हटवण्यात यावा, अशी  मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला  भोसले हायस्कूल समोरील मैदान शासनाने विद्यार्थांसाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली, त्याविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भोसले हायस्कूलविरुद्ध निकाल दिला होता, ही जागा शासनाची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता.त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी शाळेचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी महसूल मंत्र्याकडे धाव घेतली असता, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम आणि त्यावरील व्याज भरण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला देखील सुधीर पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे.त्यानंतर देखील सुधीर पाटील यांनी प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा शासनाची मान्यता न घेताच उभा केला असून, त्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे.  याबाबतचे वृत्त सर्वप्रथम धाराशिव लाइव्हने दिले होते. 


जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल 

सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ज्या मिळकत क्रमांक ४१२७ वरती अतिक्रमण करुन अनाधिकृत बाधण्यात आलेल्या इमारत संदर्भात मंत्री (महसूल), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांनी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम व त्यावरील व्याजाचा भरणा करण्याबाबत दिनांक २६ फेब्रुवारी, २०१४ रोजी आदर्श शिक्षण मंडळास आदेशित केलेले आहे.

तथापि मंत्री (महसूल), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या उक्त आदेशानुसार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने अध्याप पावेतो अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम व त्यावरील व्याजाचा भरणा केलेला नाही.  कै. के.टी.पाटील यांचा मिळकत क्रमांक ४१२७ या शासकीय जागेवर्ती पुर्णाकृती पुतळा उभा करण्याकरिता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: पुतळा-३११६/प्र.क्र.३०८/२९ दिनांक ०२ मे, २०१७ व संमक्रमांकीत शासन शुद्धीपत्रक दिनांक ०६ मे, २०१७ मधील तरतुदीनुसार जिल्हा प्रशासनाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक असताना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा प्रशासनाच्या विना अनुमती कै. के.टी.पाटील यांचा मिळकत क्रमांक ४१२७ या शासकीय जागेवर्ती पुर्णाकृती पुतळा उभा केला असल्याने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०२ मे, २०१७ व संमक्रमांकीत शासन शुद्धीपत्रक दिनांक ०६ मे, २०१७ मधील तरतुदीचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने हेतुपुरस्सर भंग केला आहे.

        तेव्हा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ज्या मिळकत क्रमांक ४१२७ वरती अतिक्रमण करुन अनाधिकृत बाधण्यात आलेली इमारत व कै. के.टी. पाटील यांचा उभा केलेला अनाधिकृत पुर्णाकृती पुतळा तात्काळ हटविण्यात यावा.