वसंतदादा बँकेच्या संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज  खंडपीठानेही फेटाळला 

पोलीस बँकेच्या संचालकाना अटक करण्याचे धाडस करणार का ? 
 

धाराशिव -   शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही शुक्रवारी फेटाळला आहे. खंडपीठाने अर्ज जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर तरी पोलीस बँकेच्या  संचालकांना अटक करणार की अभय देणार ? याकडे आता लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे एकाही संचालकास अटक करण्याचे धाडस पोलिसांनी केले नाही. 

 वसंतदादा बँकेच्या ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी २७ जुलै रोजी धाराशिव शहरातील शहर पोलीस ठाण्यात बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, तत्कालिन व्यवस्थापक दीपक देवकते यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक यांनी अद्याप जामीन अर्ज केला नव्हता. मात्र पृथ्वीराज दंडनाईक, सुरेखा दंडनाईक यांच्यासह अन्य १८ आरोपी संचालकांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र तो जिल्हा व सत्र न्यायाधीश बागे-पाटील यांनी फेटाळला होता. त्यानंतर त्यातील ६ जणांनी त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केले. मात्र तेथेही त्यांचा जामीन नाकारला. उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्या नंतर पोलिस संशयित आरोपींना कधी अटक करतात, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

वसंतदादा नागरी बँकेचे संचालक असलेले अ‍ॅड. दयानंद बिराजदार, सीए असलेले भीमराव ताम्हाणे, गणेश दत्ता बंडगर, गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, रामलिंग करजखेडे, अ‍ॅड. पृथ्वीराज विजय दंडनाईक, विष्णुदास रामजीवन सारडा, कमलाकर आकोसकर, शुभांगी प्रशांत गांधी, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे, सुरेखा विजय दंडनाईक, लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार कायम आहे.