तेरखेडा वनक्षेत्रातील कथित भ्रष्टाचाराची वन विभागाच्या टीमकडून चौकशी होणार

 

धाराशिव : भूमच्या वन परिक्षेत्र अधिकारी रोहिणी शिनगारे यांनी भू -माफियाशी संगनमत करून तेरखेडा ( ता. वाशी ) येथील राखीव वनक्षेत्रातील एक लाख वृक्षाची अवैधरित्या कत्तल करून, कोट्यवधी रुपयाचा अपहार केल्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी राज्याच्या वन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली होती. 

याप्रकरणी गैरव्यवहाराचा ठपका असलेल्या सहाय्यक वनसंरक्षक अधिकाऱ्यावर विभागीय वन अधिकारी यांनी चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आल्याने वन विभागात मिलीभगत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सुभेदार यांनी राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्याकडे पुन्हा तक्रार करून, या प्रकरणाची चौकशी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( संरक्षण ) नागपूर यांच्या मार्फत करावी, अशी मागणी केली होती. त्याची बातमी धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केली होती.  

सुभेदार यांच्या मागणीची आणि धाराशिव लाइव्हच्या बातमीची दखल घेऊन मुख्यालयातील वन विभागाच्या टीमकडून किंवा मुख्य वन संरक्षक ( औरंगाबाद ) यांच्या कार्यालयातील टीमकडून चौकशी करून दहा दिवसात अहवाल देण्याचे निर्देश राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी  यांनी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक ( संरक्षण ) नागपूर यांना दिले आहेत. 

काय आहे प्रकरण ? 

तेरखेडा येथील वन विभागाच्या ( सर्व्हे नंबर ३८० गट नंबर १२६८ ) २३ हेक्टर राखीव वन क्षेत्रामध्ये विविध प्रजातीची ५ ते २० वर्षे असलेली १ लाख झाडे शासनाच्या विनाअनुमती आणि बेकायदेशीर तोडून ३ ते ४ कोटींचा अपहार करण्यात आला असून, हा अपहार भूमच्या वन परिक्षेत्र अधिकारी रोहिणी शिनगारे आणि काही अधिकाऱ्यांनी मिळून केला आहे. त्याची सखोल चौकशी करून , गुन्हा दाखल करण्याची मागणी सुभेदार यांनी केली होती.


या तक्रारीची राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी दखल घेऊन अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक ( संरक्षण ) नागपूर यांना सुभेदार यांच्या तक्रारीची प्रत पाठवून , याप्रकरणी नियमानुसार उचित कार्यवाही करून, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र मुख्य वनसंवरक्षक ( संरक्षण ) नागपूर यांनी चौकशीचे पत्र मुख्य वनरक्षक ( प्रादेशिक) (छ. संभाजीनगर ) यांना पाठवले. त्यांनी आपली जबाबदारी विभागीय वनअधिकारी ( धाराशिव ) यांना दिली. त्यांनी सहाय्यक वनसंरक्षण ( रोहयो व कॅम्पा ) वृषाली तांबे यांना दिली. मात्र तांबे यांच्यावरच गैरव्यवहाराचा आरोप आहे. .त्यामुळे सुभेदार यांनी राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्याकडे पुन्हा तक्रार करून, या प्रकरणाची चौकशी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( संरक्षण ) नागपूर यांच्या मार्फत करावी, अशी मागणी केली होती.