स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन व हैदराबाद मुक्तीसंग्रामचा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार

- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
 

उस्मानाबाद -  विद्यार्थ्याना समजेल अशा भाषेतील हैदराबाद मुक्तीसंग्रामचा अभ्यासक्रम स्वरूपातील ग्रंथाची निर्मिती,या मुक्तीसंग्रामाच्या आठवणींवर आधारित स्वातंत्र्य संग्रामाबाबतच्या आठवणींचे दृकश्राव्य स्वरूपात चित्रिकरण,विविध आठरा विषयांवर मान्यवर इतिहास तज्ज्ञांची भाषणे, हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या ठिकाणी आणि ऐतिहासिक पुरातत्वीय स्थावर माहितींचे फलक लावणे, समाज माध्यमातून त्यास प्रसिध्दी देणे, हेरिटेज वॉकचे आयोजन करणे आदि विविध उपक्रमांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन जिल्हयात येत्या 17 सप्टेबर 2021 अर्थात हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिना पासून जिल्हयात साजरा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिली.

       हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात इतिहास तज्ज्ञ,लेखक, विचारवंत आणि ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञांसोबत आज बैठक घेण्यात आली,तेव्हा ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन सूसर, लातूर येथील बाबासाहेब परांजपे फौंडेशनचे सचिन भाऊसाहेब उमाटे,चिलवडीचे बुवासाहेब जाधव,डायटचे प्राचार्य बळीराम चौरे, प्रा.नारायण मुदगलवाड,राज कुलकर्णी,रविंद्र केसकर, केतन पुरी , जयराज खोचरे,ईटचे प्रतापभैया वि.देशमुख, अरूण प्रल्हाद कदम, चंद्रसेन देशमुख,अविनाश राठोड आदी उपस्थित होते.

      यावर्षी लोहारा तालुक्यातील हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेस शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.या शाळेची हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची भूमिका राहीली आहे.स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतात सामील होताना मराठवाडा महाराष्ट्रात आला.त्याचेही विशिष्ट असे महत्व आहे.निजामाविरुध्द लढल्या गेलेल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामासही स्वातंत्र्य लढ्याच्या अनुषंगाने खूप महत्व आहे.हा मुक्तीसंग्राम शालेय अभ्यासक्रमातून शिकविला जाण्याची गरज ओळखून तसा ग्रंथ निर्माण करण्याचा मानस आहे.ज्यातून या मुक्तीसंग्रामाची आणि त्यातही उस्मानाबाद जिल्हयातील मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची भावी पिढीला ओळख होईल.आपला इतिहास त्यांना समजेल. यासाठी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत शालेय अभ्यासक्रमाच्या धर्तीवर पुस्तक प्रकाशित करण्यात येईल.तसेच या मुक्तीसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हयाच्या संदर्भांनी विविध आठरा विषयांवर मान्यवरांकडून लेखन लिहून घेऊन त्यांचाही एक ग्रंथही प्रकाशित करण्यात येईल.विविध विषयांवर मान्यवरांचे व्याख्याने आयोजित करण्यात येतील.मुक्तीसंग्रामात प्रत्यक्ष सहभागी झालेले आणि ज्यांनी मुक्तीसंग्राम पाहिला आहे अशांच्या आठवणींचे दृकश्राव्य स्वरूपात चित्रिकरण करण्यात येणार आहे,असेही श्री.दिवेगावकर म्हणाले.

         हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास मांडताना त्या काळातील अर्थकारण, सामाजिक स्थिती,सशस्त्र लढा, पोलिस ॲक्शन, गॅझीट मधील नोंदी, खाद्य संस्कृती , तेंव्हाची लोकगिते,गाणी,लोकसंस्कृती,स्त्री जीवन, प्रशासकीय संरचना,न्यायिकप्रक्रिया आणि कायदे,वृत्तपत्रांचा इतिहास, जनगणना,पुरातत्वीय आणि अभिलेख विषयक व्यवस्था,हिंदू-मुस्लिमांतील सौहादार्यची  पार्श्वभूमी,साहित्य- आत्मकथा,भौतिक इतिहास,आरोग्य व्यवस्था आदी विषयांवर भर देण्यात येणार आहे.हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या स्थळांवर, जेथे लढे झाले,ज्या ठिकाणांना ऐतिहासिक दृष्टया महत्व आहे,तेथे माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत,असेही श्री.दिवेगावकर यांनी यावेळी सांगितले.