तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेचे 3 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन

 

धाराशिव -  ग्रेड पे वाढीच्या मागणीसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करुन देखील दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेेने 3 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना संघटनेच्या जिल्हा शाखेमार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग-2 हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-2 चे नसल्याने नायब तहसिलदारांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998 पासून संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. शासनस्तरावर मागणीचा अद्याप कोणताही विचार झालेला नाही. त्यामुळे राजपत्रित वर्ग-2 चे ग्रेडपे 4800/- करण्याबाबत संघटनेच्या वतीने यापूर्वी बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. तेव्हा तत्कालीन अपर मुख्य सचिव, महसूल मंत्री व वित्त मंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कोणतीही अंमलबजावणी न झाल्यामुळे तसेच के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समितीने नायब तहसिलदारांचे ग्रेड पे 4800/- वाढविण्याबाबत सादरीकरण करुन देखील मागणीचा कोणताही विचार झालेला नाही. त्यामुळे नायब तहसिलदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने 3 मार्च रोजी सर्व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले होते. दि. 13 मार्च रोजी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. तरी देखील शासनाने दखल न घेतल्यामुळे 3 एप्रिल 2023 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. देण्यात आले आहे.

निवेदनावर संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, बाळासाहेब वाक्चौरे, सहकोषाध्यक्ष मनोहर पोटे, तहसिलदार गणेश माळी (धाराशिव), सौदागर तांदळे (तुळजापूर), श्री.भिसे (सामान्य प्रशासन), नायब तहसिलदार राजाराम केलूरकर, प्रभाकर मुगावे, कुलदीप कुलकर्णी, संतोष बोथीकर, पंकज मंदाडे,  श्रीमती कदम यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त यांनाही देण्यात आलेल्या आहेत.