शारदीय नवरात्र महोत्सव-2023 : यात्रा व्यवस्था आणि बंदोबस्ताच्या नियोजनासंदर्भात पूर्व तयारी आढावा बैठक

 

तुळजापूर - आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने तुळजापूर शहरातील तसेच परिसरातील सर्व ठिकाणची हॉटेल्स, धाबे येथील तपासणी करून अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील व्यापाऱ्यांनी विक्रीस ठेवलेल्या हळद-कुंकू ची तपासणी करून नकली व हानिकारक रसायनिक हळद कुंकू च्या विक्रीस प्रतिबंध करावा. सुरक्षा व्यवस्था व भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे व या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने तसेच मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयी सुविधेबाबत आतापासूनच नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे सर्व विभाग प्रमुखांची यात्रा व्यवस्था व बंदोबस्ताच्या नियोजनासंदर्भात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हा अधिकारी शिवाजी शिंदे, सहाय्यक जिल्हा अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, सामान्य प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, मंदिर संस्थानचे तहसीलदार संतोष पाटील,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे तसेच जिल्हा जिल्ह्यातील सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

शारदीय नवरात्र महोत्सव शके 1945 प्रति वर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे यंदाचा  नवरात्र महोत्सव 6 ते 30 ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव भाविकांसाठी आनंदमय व भक्तिमय तर राहणारच आहे परंतु येणाऱ्या प्रत्येक भाविकास उत्कृष्ट नियोजन, चोख बंदोबस्त, सेवा, सुविधा आणि समाधान मिळेल या उद्देशाने कार्य करण्याचे जिल्हाधिकऱ्यांमार्फत आवाहन करण्यात आले.

या कालावधीत तुळजापूर नगर परिषदेची फार महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांसोबत समन्वय साधून शहरातील बैरीकेटिंग दर्शन मंडप पार्किंग व्यवस्था राज्य परिवहन बसेस साठी नियोजन तसेच शहरातील सर्व अंतर्गत रस्ते दुरुस्त करून सर्व रस्त्यावरील स्ट्रीट लाईट  सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. शहरात पिण्याचे स्वच्छ पाणी, शहराची स्वच्छता निर्जंतुकीकरण आणि मोकाट जनावरे श्वान वरा यांच्या बंदोबस्त करावा.   असलेल्या मांस विक्रेत्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अन्यथा नगरपरिषदेने यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्हाधिकारी म्हणाले महिला आणि वृद्ध भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष नियोजन करावे शहरातील दर्शनी भागात मोठ्या आकाराचे बोर्ड लावून त्यावर बान दर्शवून स्वच्छता गृहाचे ठिकाणी दर्शवावीत शहरातील प्रत्येक रस्त्यावर स्वच्छतेसाठी एक स्वतंत्र पथक नेमण्यात यावे व या पथकावर निरीक्षणासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी नेमण्यात यावे. जिल्हाधिकारी यांनी यावेळी  मंदीरात आरोग्य विभागास तीन-तीन आरोग्य पथकांची नियुक्ती करण्याबाबत निर्देश दिले तसेच यांच्या उपस्थिती व सेवा निरीक्षणासाठी एक स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याचेही आदेशित केले.

आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या राहण्याची जेवणाची व पिण्याच्या स्वच्छ पाण्याची चांगली व्यवस्था करावी असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सूचना देण्यासाठी स्पीकर्स बसविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले.

प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी त्या त्या विभागाने चोखपणे पार पाडावी तसेच हा नवरात्र महोत्सव यशस्वीरित्या आणि उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि मंदिर प्रशासन सज्ज असून सर्व भाविकांना अतिशय अल्हाददायक आणि भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाच्या आनंद घेता येईल या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांनी आपली जबाबदारी पार पाडावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.