उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा सोमवारी सुरु होणार 

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा निर्णय जाहीर 
 
निवासी वसतिगृह व आश्रमशाळा बंदच 
शाळा सुरू झाल्या तरी पालकावर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची सक्ती नाही 

उस्मानाबाद - शाळा ( इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग ) सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर उस्मानाबादचे  जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष वेधले होते. अखेर नियम आणि अटी  घालत उस्मानाबाद  जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरु करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांनी दिला आहे. 

 जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थी त्यांचे स्वत:चे घरुन येणे-जाणे करतात अशा शाळांमधील इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यात यावेत तथापि निवासी वसतिगृह, आश्रमशाळा चालू करण्यात येऊ नयेत. तसेच  जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग दिनांक 23 नोव्हेंबर  पासून सुरु करताना प्रत्येक शाळेमध्ये Thermometer, Thermal Scanner/Gun, Pulse Oxymeter, जंतूनाशक, साबण, पाणी यांचा वापर करणे तसेच मार्गदर्शक सूचनांचे (SOP) चे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. 

 जिल्ह्यामध्ये कोविड-19 चे अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद व जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स (CCC) याठिकाणी RTPCR चाचणी व RAPID ANTIGEN TEST ची व्यवस्था उपलब्ध असून जिल्ह्यातील नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, श्वसनास त्रास होणे, डोकेदुखी इ. कोविड-19 ची लक्षणे आढळून आल्यास आजार न लपविता तात्काळ वरिल नमूद ठिकाणी जाऊन कोविड-19 ची तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले.

 शाळा सुरु करण्यात आल्या तरी पालकांवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची सक्ती करु नये. गर्दी न होऊ देता समुपदेशन आयोजित करुन घरी कोणता अभ्यासक्रम स्वयंअध्ययनाने पूर्ण करता येऊ शकतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विषयनिहाय स्वयंअध्ययन शक्य असलेला अभ्यासक्रमातील भाग याची सूची बनवून इयत्ता व विषयनिहाय पालकांना देता येईल असा प्रयत्न करावा.नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोविड-19 संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून मास्कचा वापर न केल्याने व सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंन्सींग) पालन न केल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे कोविड-19 बाबत शासन निर्देशांचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी सूचित केले आहे.

ज्या संस्थांना आपल्या निवासी शाळा सुरु करावयाच्या आहेत त्यांनी अनिवासी शाळेप्रमाणे केवळ वर्ग भरवावेत. हॉस्टेल व इतर राहण्याच्या सुविधा सुरु करता येणार नाहीत. अशा परिस्थितीत पुढील सूचना येईपर्यंत ऑनलाईन सुविधा पुरविणे उचित राहील.