कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत केंद्रीय पाहणी पथकाचे बैठकीत समाधान

 

 उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत सुरू असलेल्या कामांची माहिती संगणकीय सादरीकरणाव्दारे केंद्रीय पाहणी पथकास जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली.कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

          केंद्र सरकारने उस्मानाबाद जिल्हयातील कोरोना उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय पथक पाठविले आहे. यात एनसीडीसीचे उपसंचालक डॉ.अजित शेवाळे आणि लोकंद्र कुमार यांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्‍या या बैठकीस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डि.के.पाटील,उप विभागीय अधिकारी योगेश खरमाटे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बोडके,जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.मिटकरी आदी उपस्थित होते.

          जिल्हयात कालपर्यंत  1 लाख 69 हजार 740 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.त्यापैकी 23 हजार 502 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.त्याचे प्रमाण 18.22 टक्के आहे.बांधितांपैकी 19 हजार 584 जण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 83.33 टक्के आहे.कालपर्यंत जिल्हयात 620 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सध्या जिल्हयात उपचाराखालील रुग्णांची संख्या 3 हजार 299 एवढी आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

          कोरोना रुग्णांसाठी जिल्हयात 4 हजार 559 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.व्हेंटीलेटरची संख्या 127 असून सध्या केवळ 26 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.त्यामुळे  व्हेंटीलेटरची संख्या पुरेशी आहे. शहरातील नागरिकांना कोरोनाशी संबंधित सुविधा एका छताखाली मिळाव्यात म्हणून जिजामाता मुलींच्या वसतीगृह येथे फॅसिलिटी केंद्र सुरू करण्यात आले आहे.त्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.गृह विलगीकरणासाठी कार्यप्रणाली निश्चीत करण्यात आली आहे.त्यामूळे केवळ ज्या रुग्णांच्या घरी त्यास गृह विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था आहे.त्यानाच तशी परवानगी दिली जाते.ग्रामीण भागात अशी गृह विलगीकरणाची परवानगी दिली जात नाही.गृह विलगीकरणाच्या काळात रुग्णांच्या संपर्कासाठी समित्या स्थापन केल्या आहेत.त्यास पुरेशा औषधासह एक किट दिले जात आहे, अशी माहितीही यावेळी जिल्हाधिकार दिवेगावकर यानी दिली.

          जिल्हयात कोरोना लसीकरणाचे काम गतीने सुरू आहे.जिल्हयास 88 हजार 870 कोरोना लसीचे डोस उपलब्ध झाले होते.त्यापैकी 75 हजार 13 जणांना लस देण्यात आली आहे.रोज 20 हजार नागरिकांना ही देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.जिल्हयात 93 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.