उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांचा उद्धटपणा 

तहसीलमध्ये तीन महिने हेलपाटे मारणाऱ्या अनुज कुदाळ यांना अपशब्द वापरून बाहेर हाकलले 

 
कुदाळ यांची माळी विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल 

उस्मानाबाद - उस्मानाबादचे तहसीलदार गणेश  माळी यांचा उद्धटपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. तहसीलमध्ये एका कामासाठी तीन महिने हेलपाटे मारणाऱ्या अनुज कुदाळ यांना अपशब्द वापरून बाहेर हाकलले. इतकेच काय तर कुदाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करू नये म्हणून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून खोटा गुन्हाही दाखल केला आहे. 

काय झाला प्रकार ? 

उस्मानाबाद येथील प्रसिद्ध व्यापारी लक्ष्मीकांत कुदाळ यांचे चिरंजीव अनुज कुदाळ यांनी आळणी फाटा येथील जमिनीचे एन.ए. ले-आऊट होण्यासाठी १ जुलै रोजी फाईल दाखल केली आहे. या कामासाठी गेली तीन महिने ते तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. 

दि. २२  सप्टेंबर रोजी अनुज कुदाळ हे तहसील कार्यालयात गेले असता, तहसीलदार गणेश माळी यांनी माझ्याकडे फाईल आली नाही, मला बघायला वेळ नाही असे म्हणून "भडव्या" हा अपशब्द काढून बाहेर हाकलून लावले, इतकेच काय तर पोलिसांना बोलावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून खोटा गुन्हाही दाखल केला आहे. 

या प्रकरणी अनुज कुदाळ यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करून तहसीलदार माळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

जे होईल ते होईल 

या संदर्भात तहसीलदार माळी यांच्याशी संपर्क साधला असता, यात काय खुलासा करायचा ? जे होईल ते होईल, असे म्हणून या प्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला.

Video