होळी,रंगपंचमी सार्वजनिकरित्या साजरी करण्यास उस्मानाबाद जिल्हयात मनाई

 

 उस्मानाबाद - जिल्हयात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या साथीचा प्रार्दुभाव वाढल्याने संपूर्ण जिल्हयात होळी,धुलीवंदन,रंगपंचमी हा सण-उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्यास मनाई करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  दिले आहेत.

     या आदेशानुसार सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम तसेच इतर सभा-संमेलने यांना मनाई करण्यात आलेली आहे. होळी,धुलीवंदन,रंगपंचमी या सण,उत्सवामध्ये सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे,सार्वजनिक आणि खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृह निर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे लहान मुले, युवक, प्रौढ नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित येऊन सण,उत्सव साजरा करित असल्याने गर्दी टाळण्यासाठी आणि कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात दि.28 मार्च-2021 रोजी साजरा होणारा होळी सण,उत्सव व दि.29 मार्च-2021 रोजी साजरा होणारा धुलीवंदन तसेच दि.02 एप्रिल-2021 रोजीचा रंगपंचमी सण,उत्सव साजरे करण्यास मनाई  करण्यात आली आहे. 

        जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृह निर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे दि.28 मार्च-2021 रोजी साजरा होणारा होळी सण/उत्सव व दि. 29 मार्च-2021 रोजी साजरा होणारा धुलीवंदन तसेच दि.02 एप्रिल-2021 रोजीचा रंगपंचमी सण,उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

    या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60,महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील,असेही या आदेशात म्हटले आहे.