उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांची मग्रूरी 

माळी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी
 

उस्मानाबाद - उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी राज्याच्या  महसूल विभागाच्या  सचिवाकडे केली आहे. 

उस्मानाबाद तालुक्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावनिहाय एकूण क्षेत्र, शेतकरी निहाय एकूण क्षेत्र, एकूण क्षेत्रापैकी पेरणी केलेले क्षेत्र, बाधित झालेले क्षेत्र आदींची माहिती तहसीलदार माळी यांना मागितली असता त्यांनी दिली नाही. 

आवश्यक माहिती न दिल्याने कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यांनी विधानसभा सदस्याचा जाणीवपूर्वक अवमान केलेला आहे. तसेच माळी यांच्याबद्दल जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. नागरिकांना अर्वाच्च भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, जाणीवपूर्वक प्रकरणे प्रलंबित ठेवून दप्तर दिरंगाई करणे, वाद घालणे, मारहाण करणे आदी तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. 

या सर्व तक्रारीची सक्षम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून तहसीलदार माळी यांच्यावर  तात्त्काळ कारवाई करावी, असे आ. पाटील यांनी महसूल विभागाच्या सचिवांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.