प्रेम शिंदे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले तरी मुख्य आरोपी मोकाट 

ढोकी पोलिसानी आरोपीस मदत केल्याचा संशय 
 
दि. ४ ते ६ ऑगस्ट रोजीचे ढोकी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी 

धाराशिव - प्रेम शिंदे याच्या संशयास्पद मृत्यू  प्रकरणी  ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले तरी मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही, पालकमंत्र्यांनी २४ तासात आरोपीना अटक करण्याचा आदेश देऊनही पोलीस निष्क्रिय ठरले आहेत.त्यामुळे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात असून , या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी होत आहे. 

 धाराशिव  तालुक्यातील वाणेवाडी येथील एका अध्यात्मिक आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याचा मागील मागील शनिवारी ( दि. ५ ) संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली असली तरी मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यास पोलिसांनी आठ  दिवस झाले तरी अटक केलेली नाही.

प्रेम शिंदे याचे मूळ गाव  वाखरवाडी असून, या गावात या मृत्यू प्रकरणी शोककळा पसरली आहे. प्रेम शिंदे याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वाखरवाडीकर पुढे सरसावले असून, दोन दिवसापूर्वी  गावातील हनुमान मंदिरात सरपंच नवनाथ सुरवसे यांच्या  अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या तसेच मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यास दोन दिवसात अटक न केल्यास घरोघरी चूल बंद करून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वाखरवाडी ग्रामस्थांनी दोन दिवसाचा अल्टिमेट देऊनही पोलिसांनी मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यांना अटक केलेली नाही. त्यामुळे ढोकी पोलिसांचा तपासावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी देखील याप्रकरणी लक्ष घालत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालकमंत्री तानाजी सावंत यांचा आदेश देखील पोलिसांनी धुडकावून लावला आहे, असे दिसत आहे. 

जेव्हा प्रेम शिंदे याचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा मुख्य आरोपी काका उंबरे हा ढोकी पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे मारत  होता, पण गुन्हा दाखल  होताच तो फरार झाला आहे. पोलिसांनीच त्यास पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमधील दि. ४ ते ६ ऑगस्ट रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून, आरोपीना मदत करणाऱ्या सपोनि जगदीश राऊत आणि पोलीस उपनिरीक्षक गाडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

प्रेम शिंदे याने आत्महत्या केली नसून , त्याचा खून करून प्रेत झाडास लटकावल्याचा संशय आहे. . प्रेम शिंदे याच्या  मृत्यू प्रकरणी ढोकी पोलीस दबावाखाली काम करत असून, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे तात्काळ द्यावा, आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा, मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई  करावी, अशी मागणी आहे.