प्रेम शिंदे संशयास्पद मृत्यू प्रकरणी शुक्रवारी स्पॉट पंचनामा होणार 

 

धाराशिव - वाणेवाडी येथील काका उंबरे यांच्या संस्थेत अध्यात्माचे शिक्षण घेणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) यास संस्थेतील महाराजांनी बेदम मारहाण करून झाडास गळफास दिला होता. ढोकी पोलिसांनी याप्रकरणी संस्थेच्या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल केला असला तरी ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप पालकांनी अनेकवेळा केला आहे. मागील एक महिन्यापासुन हे प्रकरण गाजत आहे आणि धाराशिव लाइव्ह हे एकमेव डिजिटल माध्यम याचा पाठपुरावा करीत आहे. 

दि. ४ ते ५ ऑगस्ट दरम्यान काका उंबरे यांच्या संस्थेत अध्यात्माचे शिक्षण घेणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) यास संस्थेतील महाराजांनी बेदम मारहाण करून झाडास गळफास दिला होता.या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देऊन आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मयत प्रेम शिंदे ( वय १४ ) याच्या वाखरवाडी गावात २९ ऑगस्ट रोजी  चूल बंद आंदोलन करण्यात आले होते. तसेच लवकरच ढोकीजवळ  लातूर- धाराशिव  रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. 

सध्या या प्रकरणाचा तपास ढोकी पोलिसाकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे तसेच पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशावरून  प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याच्या  संशयास्पद मृत्यू प्रकरणी  उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची चौकशी समिती गठीत  करण्यात आली आहे. त्यात जिल्हा शल्य चिकित्सक, गट विकास अधिकारी, एकात्मिक बाल  विकास अधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नायब तहसीलदार ( रोहयो ) विधी अधिकारी मसलेकर यांचा समावेश आहे. 

या समितीची पहिली बैठक आज दि. २२ ऑगस्ट रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी पार पडली होती. . यावेळी मयत प्रेम शिंदे याचे वडील लहू शिंदे यांनी आपले म्हणणे मांडून सर्व  पुरावे सुपूर्द  केले होते. त्यानंतर ही समिती १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ . ३० वाजता वाणेवाडी गावात जावून घटनास्थळाचा पंचनामा करून, जाबजवाब नोंदवणार आहेत. 

प्रेम शिंदे मृत्यू प्रकरणी ढोकी पोलिसांनी आरोपीस अभय दिल्याने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यानी पीएम रिपोर्ट दबावाखाली दिल्याने मयत प्रेम शिंदे याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यास अडचण येत आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा धाराशिव लाइव्ह हे एकमेव डिजिटल माध्यम  करीत आहे. बाकी अनेकजण काका उंबरे यांचे मिंधे झाल्याचे दिसून येत आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी काका उंबरे याचा मावसभाऊ कुकर्मी याने आपल्या पत्रकारितेचा दुरुपयोग केल्याचे समोर आले आहे.