कोविड-१९ मधून बरं झालेल्या रुग्णांना उद्भवत असलेल्या आजारांपासून दिलासा मिळावा यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करा...

 
-आ.राणाजगजीतसिंह पाटील



उस्मानाबाद -  कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आले आहेत अशा  व्यक्तीला हृदय, किडनी, लिव्हर यांसंबंधी समस्या उद्भवत असून बरं झालेल्या रुग्णांची नंतरचे ४० दिवस ते ४ महिने काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘पोस्ट कोविड सिंड्रोम केयर सेंटर‘ तयार करावी व राज्यातील सर्व सरकारी व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात टेलमेडिसीन पद्धतीचा वापर करून एक स्वतंत्र यंत्रणा उभी करावी अशी मागणी आ.राणा जगजीतसिंह पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

आ.पाटील यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्रात  कोरोनाचे आजमितीला १६५९२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर एकूण ५१४७९०  रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.  उस्मानाबाद जिल्ह्यात ४८७३ रुग्णांना कोरोनाची झाली होती त्यापैकी २८०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आरोग्य क्षेत्रातील तज्ञांच्या माहिती नुसार जे लोक कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आले आहेत अशा  व्यक्तीला हृदय, किडनी, लिव्हर यांसंबंधी समस्या उद्भवत असल्याचे म्हटले आहे.


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड-१९ मधून बरं झाल्यानंतर रुग्णांना फुफ्फुसांची समस्या उद्भवते. या आजारात  फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी श्वास घ्यायला त्रास  होतो.त्यामुळे कोरोनातून बाहेर आल्यानंतरही अशा रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता असते. याशिवाय हृदयासंबंधी समस्या जास्त प्रमाणात उद्भवत आहेत.


सरकारने नेमलेल्या टास्क फोर्स चे प्रमुख डॉ.संजय ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार  बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे समोर आले आहे परिणामी काहींना ह्रदयविकाराने प्राण गमवावा लागला आहे. या गुठळ्या शरीरात दूरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये देखील होत आहेत. काही रुग्णांमध्ये  मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्याने पक्षाघात होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने आ.पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे.


त्यामुळे कोविड-१९ तुन बरं झाल्यानंतर उद्भवत असलेल्या आजारांपासून बचावासाठी रूग्णांना योग्य तो वैद्यकीय सल्ला व उपचार मिळावा यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याचे मत आ.पाटील यांनी व्यक्त केले आहे.त्यांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नवी मुंबई स्थित "तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये"  टेलमेडिसीन चा वापर करून बरे झालेल्या रुग्णांसाठी अशी व्यवस्था लवकरच कार्यान्वित करत असल्याची बाब ना.टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.


कोविड-१९ मधून बरं झालेल्या रुग्णांची नंतरचे ४ महिने काळजी घेणे आवश्यक आहे, असे आता वेगवेगळ्या निष्कर्षातून समोर आले आहे.त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘पोस्ट कोविड सिंड्रोम केयर सेंटर‘ तयार करावी व राज्यातील सर्व सरकारी व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात टेलमेडिसीन पद्धतीचा वापर करून एक स्वतंत्र यंत्रणा उभी करावी अशी मागणी आ.पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना केली आहे.