उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांची चौकशी सुरु 

 अनुज कुदाळ यांच्या तक्रार अर्जावर वस्तुस्थितीची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 
 

उस्मानाबाद -  तहसीलमध्ये एका कामासाठी तीन महिने हेलपाटे मारणाऱ्या व्यापारी आणि लघुउद्योजक अनुज कुदाळ यांना अपशब्द वापरून बाहेर हाकलणाऱ्या उस्मानाबादचे तहसीलदार गणेश  माळी यांची चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

  यापुर्वीचे वृत्त  उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांचा उद्धटपणा


उस्मानाबाद येथील प्रसिद्ध व्यापारी लक्ष्मीकांत कुदाळ यांचे चिरंजीव अनुज कुदाळ यांनी आळणी फाटा येथील जमिनीचे एन.ए. ले-आऊट होण्यासाठी १ जुलै रोजी उस्मानाबाद तहसील कार्यालयात फाईल दाखल केली आहे. या कामासाठी गेली तीन महिने ते तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. 

दि. २२  सप्टेंबर रोजी अनुज कुदाळ हे तहसील कार्यालयात गेले असता, तहसीलदार गणेश माळी यांनी माझ्याकडे फाईल आली नाही, मला बघायला वेळ नाही असे म्हणून "भडव्या" हा अपशब्द काढून बाहेर हाकलून लावले, इतकेच काय तर पोलिसांना बोलावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून खोटा गुन्हाही दाखल केला आहे. 

या प्रकरणी अनुज कुदाळ यांनी दि. २७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करून तहसीलदार माळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन वस्तुस्थितीची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल मुदतीत देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे.