उस्मानाबाद : कोण म्हणतंय माणुसकी संपली ? त्या ८० वर्षाच्या आजीबाईचे अनुभव विचारा ...

 


उस्मानाबाद -  सध्याच्या कलियुगात माणुसकी संपली आहे, असे आपण नेहमीच म्हणतो. पण या जगात सगळेच वाईट नसतात, अजूनही माणुसकीचा झरा पाझरतो, हे उस्मानाबादच्या एका तरुणाने कृतीतून दाखवून दिले आहे. 



 उस्मानाबादच्या आंबडेकर चौकात ८० वर्षाच्या एक आजीबाई रत्यावरून जाणाऱ्या येणाऱ्याकडे पाहून गावाकडे जाण्यासाठी १० रुपये मागत होत्या, पण अनेकांनी त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले, हे दृश्य चौकात कामामानिमित्त  उभे असलेल्या ओंकार नायगावकर यांना  सहन झाले नाही.  तिची ही अवस्था पाहून ओंकारच्या संवेदनशील मनात कालवाकालव झाली. त्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर त्याची आजी आली. आपल्या आजीची काळजी घेण्यास आई-काकू आहेत; हिला कुणी नसेल का? असा प्रश्न त्याला पडला. त्याने आजीची विचारपूस केली. तेव्हा तिचे नाव रसिकाबाई शिंदे (शिंगोली, ता. उस्मानाबाद) असल्याचे त्याला कळाले.



निराधार योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी ती शहरात आली होती. तिला जवळचे असे कुणीच नातेवाईक नसल्याचेही तिनं सांगितले. तिच्या अंगावर ठिगळाची नऊवारी होती. तीही एकच असल्याचे ओंकारला समजले. त्याचे मन द्रवले. त्याने लागलीच आजीला पहिल्यांदा थंड ज्यूस प्यायला दिले. नंतर कापड दुकानात नेऊन तिच्या आवडीची नऊवारी तिला घेऊन दिली. आवश्यक ती मदत करून थेट तिच्या स्वतःच्या चार चाकी वाहनातून घरी सुखरूप पोचविले. शिवाय फळंही घेऊन दिले. शिवाय यापुढेही मदत करण्याचे आश्वासन दिले. रस्त्यात भेटलेल्या या माणुसकीमुळे आजी भारावून गेली. तिनं ओंकारच्या डोक्यावर हात ठेवून त्याला भरभरून आशीर्वाद दिला.




 रसिकाबाई शिंदे यांना  मुले आहेत पण कुणीच सांभाळत नाही. त्या  शिंगोली, ता. उस्मानाबाद येथे एका छोट्या खोलीत भाड्याने राहतात , उस्मानाबाद ते शिंगोली हे अंतर आठ किलोमीटर  आहे. उस्मानाबाद शहरात  मिळेल त्या ठिकाणी धुणीभांडी करून उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना कुणी मदत करेल का ? 


यानिमित्त ओंकार नायगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली असून, त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. 

 

कुणाचे देव देवळात असतात, तर कुणाला देव रस्त्यावर भेटतात. असेच आज नवरात्राच्या दिवसात या माऊलीची अचानक भेट झाली. आजीना...

Posted by Omkar Naigaonkar on  Thursday, October 22, 2020