उस्मानाबाद : पान टपऱ्या उघडण्यास परवानगी

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटू लागल्यामुळे  आजपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेल्या पान  टपऱ्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यासंदर्भात नवा आदेश काढला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण या आठवड्यात कमी झाले आहेत. तसेच उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.सध्यस्थितीमध्ये  जिल्ह्यात उपचाराखालील रुग्ण ७३३ आहेत. रुग्ण कमी झाल्याने दुकाने बंद  करण्याची वेळ रात्री ७ ऐवजी रात्री ९ करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सर्व दुकाने उघडी राहणार आहेत. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 


जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी मंगळवारी काढलेल्या आदेशानुसार कंटेनमेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील बाजारपेठ किंवा दुकाने यांच्यासाठी २ तासांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यानुसार अाता जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. शिवाय औषधांची दुकाने व पेट्रोलपंप मात्र २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 


कंटेन्मेंट झोनवगळता इतर क्षेत्रात व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी असेल, मात्र, याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने घालून दिलेल्या अटींचे पालन करावे लागेल. पान, तंबाखूच्या विक्रीसही सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत परवानगी देण्यात येत आहे.मात्र, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, तसे केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


रेल्वेद्वारे जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांनी फिजिकल डिस्टन्स व निर्जंतुकीकरण तसेच कोविडसंदर्भातील नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविण्यासही परवानगी देण्यात आली आहे. जनावरांचे बाजारही आता भरविले जाऊ शकतात. विवाह समारंभासाठी ५० व्यक्ती व अंत्यसंस्काराच्या विधीसाठी २० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पान  टपऱ्या गेल्या सहा महिन्यापासून बंद होत्या, त्यामुळे पान  शौकिनांची गैरसोय होत होती. आता पान  टपऱ्या उघडण्यास परवानगी देण्यात आल्याने तंबाखूजन्य पदार्थाची पिचकारी आणि सिगारेटचा धूर निघणार आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी घालण्यात आली आहे.