शेतक-यांना हेक्टरी २५ व ५० हजार मदत देऊन उध्दव ठाकरे यांनी शब्दाला जागावे -आ. सुजितसिंह ठाकूर
शपथविधीपुर्वीचे बांधावरचे शेतकरी प्रेम पुतणा मावशीचे आणि अश्रू मगरीचे होते का?
उस्मानाबाद - मराठवाड्यासह अनेक भागात अतिवृष्टी व सातत्याने पडणा-या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना कायमच मदतीविना वाऱ्यावर सोडले आहे. मुख्यमंत्र्यासह सत्ताधा़ऱ्यांचे बोलाचीच कडी अन् , बोलाचाच भात असे वागणे आहे. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी जिरायती २५ हजार व बागायती ५० हजार रुपये द्यायला हवे म्हणणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या आपल्या शब्दाला कधी जागणार ? असा सवाल करुन आपदग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस व विधान परिषदेचे मुख्यप्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.
आ. सुजितसिंह ठाकूर पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील चालु खरीप हंगामातील शेतक-यांच्या पिकांचे अतिवृष्टी आणि सातत्याने पडणारा पाऊस यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. यापुर्वीही नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेला परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यानंतर मार्च व एप्रिल २०२० मध्ये प्रचंड वेगाचा वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे मराठवाडयातील रब्बी हंगामातील काढणी करुन ठेवलेल्या आणि काढणीस आलेल्या ज्वारी, गहु, हरभरा पिकांचे त्याबरोबरच आंबा, द्राक्ष, मोसंबी, संत्रा, केळी बागा, फळपिकांचे आणि पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले. आता पुन्हा मराठवाड्यासह अनेक भागात चालु खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टी आणि सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन, तुर, मका, बाजरी, कपाशी तसेच भाजीपाला आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
यापुर्वी नोव्हेंबर २०१९ आणि मार्च व एप्रिल २०२० असे तीन वेळा नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना अद्याप हेक्टरी २५ व ५० हजार तर सोडाच परंतु दमडीचीही मदत दिलेली नसल्याचे सांगून आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत नोव्हेंबर २०१९ मध्ये उध्दव ठाकरे यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन ‘कोणतीही अट न घालता हेक्टरी २५ हजार आणि ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली पाहीजे म्हणाले होते.’ मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर उध्दव ठाकरे यांना आपल्या वक्तव्याचा सोयीस्कर विसर पडला असून अद्याप शेतकऱ्यांना दमडीचीही मदत दिली नाही. यांचे शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम बेगडी व पुतणा मावशीचे आणि बांधावर शेतकऱ्यांच्या नावाने ढाळलेले अश्रू मगरीचे होते का ? असा संतप्त सवालही आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केला.
मराठवाड्यातील शेतकरी सततचा दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यामुळे त्रस्त असुन पुरता मेटाकुटीस आलेला असुन गेल्या दहा महिन्यात मराठवाड्यातील शेतक-याला ३-४ वेळा मोठ्या नैसर्गिक आपत्ती तसेच खरीप हंगामातील बोगस बियाने, पिकांची उगवण न होणे, दुबार व तिबार पेरणी करावी लागणे, बँकाकडुन पिक कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. आतातरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आतापर्यंतच्या झालेल्या सर्व नुकसानीची मराठवाड्यात येऊन बोलल्याप्रमाणे जिरायतीस हेक्टरी २५ हजार व बागायतीस हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने देऊन संकटात सापडलेल्या शेतक-याला आधार द्यावा अशी मागणी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.