केंद्रिय आयकर विभागातील भरतीमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडुंना संधी

 

उस्मानाबाद -केंद्र शासनाच्या आयकर विभागाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडुंकरिता विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम आयकर विभागामार्फत दि.08 जुलै-2021 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.पात्र खेळाडुंनी अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले आहे.

       जाहिरात आणि त्यासंबंधित इतर माहिती ww.incometaxmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.या जाहिरातीमधील परिच्छेद २ मध्ये पात्र खेळ प्रकार नमूद केले आहे. परिच्छेद ३ मधील मुद्दा क्र. ३ अन्वये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत.

       या जाहिरातीमधील परिच्छेद ४ आणि ५ मधील मुद्दा क्र. ४ अन्वये संबंधित खेळाडुंनी शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे.जिल्हयातील खेळाडुंना / संघटनांना/पालकांनी जाहिरीतीमधील पात्रता निर्देशानुसार केवळ भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडुंनी सदर प्रमाणपत्र प्रमाणित करुन घेण्यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, बालेवाडी, पुणे येथे न जाता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेतच (सुट्टीचे दिवस वगळुन) आपला अर्ज सादर करावा. संपुर्ण नाव, पत्ता, ई मेल आणि मोबाईल क्रमांक इ माहिती आणि शालेय राष्ट्रीय स्पर्धेच्या मुळ प्रमाणपत्र आणि झेरॉक्स प्रतीसह अर्ज जमा करावा.

     इच्छुकांनी आपले अर्ज दि. 13 ऑगस्ट 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे जमा करावेत. उशिराने प्राप्त झालेल्या अर्जवार विहीत मुदतीत संचालनालयाकडून कार्यवाही न झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसेच जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या खेळांच्याच खेळाडुंनी आणि केवळ भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडुंनी या कार्यालयाकडे विहीत मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले आहे.