४० केंद्रावर ९८५० जणांना देण्यात येणार फक्त कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस

 

उस्मानाबाद -  ४५ वर्षाच्या पुढील ज्या नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा‌ पहिला डोस व ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत, केवळ अशा नागरिकांनाच दि.३१ मे रोजी जिल्ह्यातील ४० आरोग्य केंद्रावर कोविशिल्ड लसीचाच पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

४५ वर्षाच्या पुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर यांना फक्त कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. लसीकरण करण्यात येणारी आरोग्य केंद्रे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद - कनगरा, खेड, दाऊतपुर, बावी (केशेगाव), टाकळी, ताकविकी, खानापूर, सारोळा व आळणी तर तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी, सलगरा मड्डी, देवकुरुळी, सिंदफळ, शहापूर, बारुळ व काटी तसेच उमरगा तालुक्यातील केसरजवळगा, कसगी, तलमोड, गुगळगाव व तुगाव व लोहारा तालुक्यातील दस्तापूर, जेवळी (दक्षिण), भातागळी व धानोरी २६ केंद्रावर ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 

 उस्मानाबाद  शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर, ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद अशा ४० आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत व नवीन पहिला डोस घेणाऱ्यांनाच पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहेत. 

त्यासाठी डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदविलेले ओळखपत्र सोबत घेऊन जावे. त्यामुळे दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे. या दिवशी फक्त कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार असल्यामुळे इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. सदरील लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.

यासाठी लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही.लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्याला पैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे तसेच लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे यावेळी केंद्रावरील उपलब्ध दोस्त च्या संख्येच्या प्रमाणातच टोकन वाटप करण्यात येणार आहेत. 

ज्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा असे दोन्ही डोस दिले जाणार आहेत, अशा ठिकाणी दोन्ही डोसच्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र नोंदणी आणि रांगा ठेवण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी व उपस्थित लाभार्थ्यांनी देखील गर्दी न करता कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवीत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.