ऑनलाइन व्यापारास १ जूनपर्यंत बंदीच 

उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाचा सुधारीत आदेश
 

उस्मानाबाद  - जिल्ह्यातील कोरोना विषाणूंची बाधेने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना या अनुषंगाने दि. १ जूनपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. मात्र ई-वाणिज्य सेवा म्हणजेच ऑनलाईन व्यापार (जसे - ॲमेझॉनसह इतर प्रकारचे व्यवहार) करण्यासाठी पुर्णपणे बंदी असल्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी ‌यांनी दिले आहेत.

दिलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.१ जूनपर्यंत वाणिज्य सेवा सुरू राहतील किंवा कसे ? याबाबत काही  आस्थापनाकडून शंका उपस्थित होत असल्यामुळे हे आदेश दिले आहेत. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्येही वाणिज्य सेवा बंद करण्या बाबत कोणतीही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र या कार्यालयाचे आदेश दि. १४ एप्रिल २०२१ नुसार या ई-वाणिज्य सेवे अंतर्गत फक्त अत्यावश्यक सेवा व वस्तूंच्या पुरवठ्यासाठी परवानगी राहील. 

तसेच ई-वाणिज्य सेवा देणाऱ्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण करून घ्यावे. तर या घरपोच सेवेचा प्रक्रियेमध्ये कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा उल्लंघन केल्यास १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच अशाप्रकारे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कोविड-१९ जोपर्यंत साथरोग म्हणून अधिसूचित राहील. तोपर्यंत संबंधित ई-वाणिज्य सेवा आस्थापना चालू ठेवण्याची परवानगी रद्द करण्यात येईल असे स्पष्टपणे या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन वस्तू मागविणाऱ्या व्यक्तींनी देखील यापुढे अशा पद्धतीने कोणत्या वस्तू अत्यावश्यक सेवेमध्ये येतात ? याचा विचार करूनच मागविणे आवश्यक आहे.