तेरणा नदीपात्रात एकजण वाहून गेला 

 

ढोकी  - उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे उस्मानाबाद लातूर मार्गावर असलेल्या रुई-ढोकी जवळील पुला शेजारील बंधाऱ्यातून एकाचा पाण्यात तोल गेल्याने तो वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दि. ५ सप्टेंबर रोजी घडली आहे.

 कळंब तालुक्यातील गौर वाघोली येथील लक्ष्मण ताकपिरे (५३) हे उस्मानाबाद तालुक्यातील रुई-ढोकी परिसरात असलेल्या उस्मानाबाद-लातूर या राज्यमार्गावर पुला शेजारील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते. दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते मासे पकडत असताना त्यांच्या सोबत असलेल्या एकाचा पाय घसरून तोल गेल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी लक्ष्मण ताकपिरे यांनी बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली. 

मात्र बंधाऱ्यातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे व त्या प्रवाहात निर्माण झालेल्या पाण्याच्या भवर्‍यात अडकल्याने ते नदी पात्रातील पाण्यात वाहून गेले. याची माहिती त्यांच्याजवळ असलेल्या उपस्थित नागरिक व स्थानिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळविल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने या नदीपात्रात जाऊन शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु आहे. 

त्यातच सायंकाळी पडलेल्या अंधारामुळे शोध मोहीम राबविण्यात आली. तर वृत्त लिहीपर्यंत देखील त्या व्यक्तीचा शोध लागला नव्हता. त्यामुळे नदी अथवा तलाव तसेच ओढ्यातील पाण्याचा प्रवाह असल्यास कोणीही त्या प्रवाहित पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.