धाराशिव झेडपीच्या आरोग्य विभागातील पदभरती घोटाळा प्रकरणी एकाचा राजीनामा 

दोषी अधिकाऱ्यास  निलंबित करून  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना सीईओनी स्वतःवरची जबाबदारी झटकली 
 

धाराशिव  - धाराशिव जिल्हा परिषदेतील कथित पदभरती प्रकरणी दोषी अधिकाऱ्यास निलंबित करून त्याच्याविरुद्ध  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना, डॉ. किरण गरड, जिल्हा कार्यक्रम  व्यवस्थापक, राज्य आरोग्य अभियान, धाराशिव यांचा राजीनामा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतःची जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात वसुली सुरु आहे, हे विशेष. 


राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) च्या वतीने कंत्राटी पदाची पदभरती करण्यासाठी  एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात  एमपीडब्लू ( पुरुष ) यांच्या १८ तर स्टाफ नर्स यांच्या १७ जागा निघाल्या होत्या.  सदर भरती करताना लेखी परीक्षा न घेता थेट तोंडी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. एमपीडब्लू ( पुरुष ) जागेसाठी सॅनिटरी इन्फेक्टर कोर्सची आवश्यकता आहे.  ज्या उमेदवारांनी सॅनिटरी इन्फेक्टर  कोर्सची प्रमाणपत्रे  जोडली आहेत त्यातील अनेकांची  प्रमाणपत्रे बोगस आहेत. त्यांनाही पात्र ठरवण्यात आले आणि एक ते दोन लाख घेऊन ही भरती करण्यात आली.

याप्रकरणी  धाराशिव ( उस्मानाबाद ) लाइव्हने २८ ऑक्टोबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची राज्याचे तत्कालीन आयुक्त ( आरोग्य विभाग ) तुकाराम मुंडे यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी एक पत्रक काढून उमेदवारांना पैसे न देण्याचे जाहीर आवाहन केले आहे. पण  उमेदवारांनी डॉ. किरण गरड जिल्हा कार्यक्रम  व्यवस्थापक, राज्य आरोग्य अभियान, धाराशिव यांच्याकडे अगोदरच पैसे दिले होते आणि ही भरती वशिल्याने आणि ज्यांनी पैसे दिले त्यांची करण्यात आली. 

या भरतीची सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी माहितीच्या अधिकारात  माहिती मागितली असता, अनेक गंभीर  बाबी निदर्शनात आल्या. त्यानंतर प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी, आरोग्य विभागात वसुली करणाऱ्या  डॉ.  किरण गरड , जिल्हा कार्यक्रम  व्यवस्थापक, राज्य आरोग्य अभियान, धाराशिव यांचा  राजीनामा घेतला आहे. गरड यांनी  जवळपास ५० ते ६० लाख  रुपये घेतल्याचे समोर आले आहे. 

वास्तविक  डॉ. गरड यास निलंबित करून, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतःवरची जबाबदारी झटकून टाकली आहे. डॉ. किरण गरड यांनी तोंड  उघडल्यास जिल्हा परिषदेचे अन्य वाटेकरी समजू शकतात. मोठे मासे वाचवण्यासाठी एका छोट्या माश्याचा बळजबरीने बळी देण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य विभागात घोटाळे उघडकीस येत आहेत, हे येथे उल्लेखनीय.  

जि. प. आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कंत्राटी पदाची पदभरतीमध्ये महाघोटाळा

प्रतिनियुक्तीचे कोणतेही अधिकार नसताना, अधिकाराचा गैरवापर करून , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी  ८ ते १०  वैद्यकीय  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती दिल्याचे प्रकरण धाराशिव  लाइव्हने काल उघडकीस आणले होते.तसेच यापूर्वी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील पदभरती प्रकरण सुद्धा उघडकीस आणले आहे.